श्रीरामपूर : शेतकऱ्यांचे भुसार खरेदीचे पैसे बुडवून पळ काढणाऱ्या माळवाडगाव येथील मुथ्था परिवाराला पोलिसांनी जेरबंद केले. मात्र आता त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा मोठा पेच उभा राहिला आहे. मुथ्था यांनी त्यांच्या संपत्तीवर यापूर्वीच पतसंस्थांचे मोठे कर्ज उचलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे पीडित शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
तालुका पोलिसांनी या गुन्ह्यात रमेश मुथ्था, चंदन मुथ्था, गणेश मुथ्था, आशा मुथ्था व चांदनी मुथ्था यांना अटक केली होती. यातील चांदनी मुथ्था यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. अन्य आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच इतर मालाचे दोन कोटी रुपये बुडवून हे व्यापारी जालना व धुळे जिल्ह्यात नातेवाइकांकडे फरार झाले होते. व्यापारी मुथ्था यांचा भुसार माल खरेदीचा माळवाडगाव येथे मोठा व्यवसाय होता.
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी गुन्ह्यात जालना येथून विनोद काबरा याला ताब्यात घेणार असल्याचे लोकमतला सांगितले. काबरा हा मुथ्था यांचा नातेवाईक आहे. त्याच्याकडे गुन्ह्याची माहिती आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे काबरा याला अटक करता आलेली नाही, असे साळवे यांनी स्पष्ट केले.
.................
कोट्यवधींचे कर्ज
पोलीस तपासामध्ये मुथ्था यांनी माळवाडगाव येथील बंगल्यावर १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील त्यांच्या मालकीच्या प्लॉटवरही कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे संपत्तीतून शेतकऱ्यांचे पैसे परत करणे अवघड झाले आहे.
------------
पाच वाहने जप्त
तालुका पोलिसांनी मुथ्था परिवाराकडून २५ लाख रुपयांची वसुली केली आहे. त्यात चार वाहने व काही रोख रकमेचा समावेश आहे. मात्र गुन्ह्याची व्याप्ती पाहता ही जप्तीची कारवाई तोकडी आहे.
-------------
गुन्ह्याचा तपास सुरू आहे. दोन आरोपींना कोरोना झाल्यामुळे त्यांना अटक झालेली नाही. शहरातील एका पतसंस्थेकडून मुथ्था यांच्या कर्जासंबंधीची माहिती घेणार आहोत. मात्र लॉकडाऊनमुळे ती उपलब्ध होत नाही.
- मधुकर साळवे, निरीक्षक, तालुका पोलीस ठाणे
------------