सध्या आंब्याला मोठ्या प्रमाणावर बहर येत आहे. याबरोबरच कांद्याचा डोंगळा, डाळिंब, टोमॅटो, मोहरी आदी पिकांवर चांगल्या प्रकारे फुले आलेली आहेत. या फुलांमध्ये फळधारणा होण्यासाठी मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे रासायनिक फवारणीचे प्रमाण वाढत चालले आहे. या मोसमात आंब्याच्या झाडावर मोठ्या प्रमाणावर बहर आलेला असतो. या झाडांवर मधमाशाही घोंगावतात. झाडांवरच एकत्र येत मोहळ तयार करतात. यापाठोपाठ कांद्याच्या बियांच्या डोंगळ्यालाही फुले आलेली असतात. त्यामुळे मधमाशांची संख्या अधिक असते. मात्र, यावर्षी सतत हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांनी फळबागांवर आंब्याच्या झाडांसह सर्रास फवारणी केली आणि या रासायनिक फवारणीमुळे मधमाशांची संख्या कमी झाली. याचा परिणाम फळधारणेवर झालेला दिसून येत आहे.
.........
माझ्या शेतात साठ केशर आणि हापूस आंब्याची झाडे लावलेली आहेत. यावर्षी झाडांना बहर चांगला आला होता. मात्र, हवामानात सतत बदल झाल्याने एकदा रासायनिक फवारणी केली. मात्र, त्यामुळे मधमाशा गायब झाल्या आहेत. याचा परिणाम फळधारणेवर झाला असल्याने मी मधमाशांच्या तयार पेट्या घेण्याच्या विचार करीत आहे.
-रामहरी कानवडे, अंबड, ता. अकोले
..............
फळपिकांमध्ये कळी सेट होण्याकरिता मधमाशी मुख्य भूमिका बजावत असते. परागीभवनाच्या क्रियेत पुंकेशर हे मादी फुलांतील स्त्रीकेशरांपर्यंत परागकण वहन करतात. यातून बीजधारणेची प्रक्रिया होते. अधिक प्रमाणात होत असलेल्या रासायनिक फवारणीमुळे मधमाशांची संख्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे काही फुलांमध्ये परागीकरण प्रक्रियेवर त्याचा परिणाम दिसत असून, काही फुलांमध्ये बीजधारणा होत नसल्याने फुले गळून पडतात.
- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी