कर्जत : सीना धरणाचे आवर्तन सुटले असून, कुकडीचे पाणी कधी सुटणार, याकडे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कुकडी लाभक्षेत्रातील फळबागा, पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. गेल्या दोन आवर्तनांप्रमाणे पाण्याची वाट पाहण्याची वेळ तर येणार नाही ना अशी शंका शेतकऱ्यांना सतावत आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सीना धरणातून पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. एकूण पंचवीस दिवसांचा आवर्तन कालावधी असून, ‘टेल टू हेड’ पाणी मिळणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव बाजीराव थोरात यांनी दिली. ऐन उन्हाळ्यात उभी पिके व फळबागांना यामुळे जीवदान मिळण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांबरोबरच प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चला कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. ऑनलाइन बैठकीत एक एप्रिल रोजी सीना धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्याचे निश्चित झाले. त्यानुसार आवर्तन सोडण्यात आले आहे. सीना धरणाची २ हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असून, सध्या १ हजार ३११ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे. एका आवर्तनासाठी ९८४ दशलक्ष घनफूट पाणी लागत असून, दोन उन्हाळी आवर्तने पिकासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहेत. या आवर्तनात एकूण सोळाशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
सध्या उन्हाची काहिली वाढल्यामुळे विहिरी आणि कूपनलिका यांनी तळ गाठला होता, तसेच पाण्याची टंचाई निर्माण होण्याची चिन्हे होती. यामुळे शेतकरी धास्तावले होते. सीनाच्या पाण्यामुळे मिरजगाव, माहिजळगाव परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
कुकडीचे चित्र काहीसे वेगळे राहिले. पहिले आवर्तन आले नाही. दुसरे आवर्तन सोडण्यात आले ते सर्व शेतकऱ्यांना मिळाले नाही. गेल्या हंगामात ज्वारीला कुकडीचे पाणी मिळाले नाही. मग आता तरी पिकांना कुकडीचे पाणी मिळणार की नाही, हा मोठा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. पाण्याअभावी पिके, फळबागा जळू लागल्या आहेत. कुकडीच्या पाण्याचा कर्जत तालुक्यातील तीस हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होतो. २०१४ पासून गेल्या वर्षापर्यंत कुकडीचे आवर्तन वेळेत मिळत होते. मात्र, आता आवर्तनाचा बट्ट्याबोळ होत आहे. गेले आवर्तन रबी पिकांची काढणी झाल्यावर आले. यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. शेतकऱ्यांनी कुकडीचे पाणी मिळणार हे गृहीत धरून कांदा, गहू, चारा पिके, फळबागा यांना पाणी देण्याचे नियोजन केले आहे. कुकडीच्या उन्हाळी आवर्तनाबाबत ९ एप्रिलला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कुकडीच्या आवर्तनाचा निर्णय होणार आहे. कुकडीचे पाणी कधी सुटणार या निर्णयाकडे कुळधरण, येसवडी, दूरगाव, वडगाव, राशीन, चिलवडी, थेरवडी, बेनवडी, अळसुंदे, आंबिजळगाव, खातगाव, शेगुड, कोरेगाव, चापडगाव या भागांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
--
०३ सीना, ०३ कुकडी
सीनाचे आवर्तन सुटल्याने वाहत असलेला कालवा. दुसऱ्या छायाचित्रात पाण्याची प्रतीक्षा असलेला कुकडीचा कोरडाठाक कालवा.