बोधेगाव: पिण्याच्या पाणी प्रश्नासह विविध मागण्यासाठी तालुक्यातील वरखेड येथील ग्रामस्थांनी शेवगांव - गेवराई रस्त्यावर गदेवाडी फाटा येथे सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय जगताप यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आज ग्रामस्थांनी सकाळी ११ वाजता शेवगाव गेवराई रस्त्यावरील गदेवाडी फाटा येथे गावामध्ये पाण्याचा टँकर सुरु करावा, यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जनावरांना चा-याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. तेव्हा या परीसरात चारा छावण्या सुरु कराव्यात, बोंडअळीचे राहीलेले अनुदान शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करावे, रोजगार हमी योजनेमार्फत नागरीकांना मागेल त्याला काम मिळावे या इतर मागण्यांसाठी एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठया संख्येने महिला हंडे घेवून सहभागी झाल्या होत्या. विस्तार अधिकारी जगताप यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.ग्रामस्थांनी मागण्यांचा विचार न झाल्यास कुठलेही पुर्वसुचना न देता तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा खरेदी विक्री संघाचे संचालक हनुमान पातकळ यांनी यावेळी दिला. या आंदोलनात बिभीषण काळे, ज्ञानदेव तेलोरे, पांडूरंग तेलोरे, अशोक तेलोरे, भागचंद शिरसाठ, राजेंद्र नजन, लक्ष्मण तेलोरे, बाबासाहेब काळे, संदीप तेलोरे, केशरबाई तेलोरे, मंगल तेलोरे, लता तेलोरे, सरस्वती काळे, सिंधूताई पातकळ यांच्यासह ग्रामस्थ व महीला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. शेवगाव पोलीस ठाण्याचे गुप्तवार्ता विभागाचे राजेंद्र चव्हाण यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
शेवगाव - गेवराई रस्त्यावर वरखडे येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 6:03 PM