शेवगाव : बेकायदा वाळू वाहतूक करणा-या वाळू तस्करांच्या वाहनांचा शेवगावचे प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पाठलाग केला. यावेळी वाळूतस्करांनी वाळूने भरलेला ट्रक पथकाच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयाच्या जिमखान्या समोरील नगर-मिरी हमरस्त्यावर हा थरार घडला. आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी शेवगाव महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे.जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार प्रभारी तहसीलदार गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील तुकाराम किसन बुळे, बाळासाहेब चंद्रकांत केदार, दत्तात्रय वसंत पालवे यांचे महसूल पथक वडुले गावाकडे निघाले होते. त्यांना समोरून वाळूने भरलेला ट्रक आल्याचे दिसल्याने पथकातील कर्मचा-यांनी आपल्याकडील मोटारसायकल आडव्या लावून ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाळूतस्करांनी ट्रक अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या ट्रकमध्ये नागेश गोविंद निकाळजे (रा.इंदिरानगर,शेवगाव) व अनोळखी व्यक्ती असल्याचे गुंजाळ यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी नागेश निकाळजे व इतरांविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे तपास करीत आहेत. या घटनेत महसूल पथकाकडील दोन मोटारसायकलींची मोडतोड झाली.अटक होईपर्यंत काम बंद आंदोलनशेवगाव तालुका तलाठी संघ व महसूल कर्मचारी संघटनेने या घटनेचा निषेध केला असून घटनेनंतर वाहनासह फरार झालेल्या आरोपीस अटक होई पर्यंत काम बंद आंदोलन पुकारण्याची माहिती जिल्हा तलाठी संघटनेचे एस.बी.लवांडे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब अंधारे, विष्णू खेडकर, महसूल कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक नरोड यांनी दिली.
शेवगावमध्ये महसूल पथकावर ट्रक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 2:22 PM
बेकायदा वाळू वाहतूक करणा-या वाळू तस्करांच्या वाहनांचा शेवगावचे प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पाठलाग केला.
ठळक मुद्दे शेवगावातील पहाटेचा थरार: महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन