संगमनेर : अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात. कोरोनाच्या काळात कोणत्याही विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक, परीक्षा शुल्क आकारू नये. संपूर्ण शिक्षण मोफत देणे ही शासनाची जबाबदारी असून प्रवेश प्रकियेसाठी नियम बनवावा. यासह अनेक मागण्यासांठी छात्रभारती संघटनेच्यावतीने शुक्रवारी (१० जुलै) संगमनेर प्रांतकचेरी बाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
छात्रभारतीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हाध्यक्ष प्रशांत काकड, कार्याध्यक्ष तुषार पानसरे, तालुकाध्यक्ष गणेश जोंधळे, राहुल जºहाड हे या उपोषणात सहभागी झाले होते.
पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेतात. त्यांची सर्व व्यवस्था करावी लागेल. एकीकडे राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रूग्ण सापडलेला प्रत्येक परिसर प्रतिबंधीत केला जातो आहे. त्यामुळे प्रतिबंधीत परिसरातील विद्यार्थी बाहेर पडणार कसे? तसेच पालक मुलांना शहरांमध्ये पाठवू शकत नाही. त्यामुळे अंतिम वर्षाची परिक्षा रद्द करावी, अशी मागणी छात्रभारती संघटनेच्यावतीने केली आहे.