राज्याचे माजी मंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील कुकडी पट्ट्यातील भागाचा दौरा केला. या भागातील फळबागा व पिकांची पाहणी केली. यावेळी कोळवडी येथील महिला राधा संतोष फोंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्याकडे आपली व्यथा मांडली. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही कुकडीला पाणी आलं नाही. यामुळे आम्ही शेतकरी खूप अडचणीत सापडलो आहोत. पिके जळाली आहेत. साहेब कर्ज काढून गाई घेतल्या. त्या आजारी पडल्या. गळ्यातलं मोडून उपचार केले. दुधाला भाव नाही. आता आम्ही जगायचं कसं. आत्महत्या करायची वेळ आली, असे म्हणत राधा फोंडे यांना रडू कोसळले. आई रडत आहे हे पाहून त्यांची लहान मुलेही रडू लागली. यावेळी मोठे भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे, किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, शहराध्यक्ष वैभव शहा, धांडेवाडीचे सरपंच काकासाहेब धांडे, डॉ. विलास राऊत, अमृत काळदाते, अनिल गदादे, शरद म्हेत्रे, हनुमंत गावडे, राहुल निंभोरे आदी उपस्थित होते.
............
ताई रडू नका, दिवस बदलतील
ताई रडू नका. हे दिवस बदलतील. धीर धरा. खचून जाऊ नका. कुकडीला पाणी मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही देत शिंदे यांनी महिलेची समजूत काढली व धीर दिला.
...............
पिके, फळबागा जळण्यास पवार जबाबदार
कर्जत तालुक्यातील पिके व फळबागा मोठ्या प्रमाणावर जळाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कुकडीचे नियोजन बिघडले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कर्जत, जामखेड, करमाळा, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांच्या हक्काचे पाणी पुणेकरांनी पळवले आहे. आमदार रोहित पवार यांनी कर्जत, जामखेड तालुक्यातील जनतेला कुकडीच्या पाण्याचा हिशेब द्यावा. मतदारसंघातील शेतकरी व जनतेवर अन्याय केला आहे. तो आम्ही सहन करणार नाही. यासाठी तीव्र आंदोलन करू. कर्जत, जामखेडकरांना कुकडीच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यास आमदार रोहित पवार व कालवा सल्लागार समिती जबाबदार आहे, असा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला.
...................
कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील पाण्याअभावी जळालेल्या पिकांची पाहणी करताना माजी मंत्री राम शिंदे.