सोनई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश शरदचंद्र बोबडे यांनी शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शनीशिंगणापूर येथे शनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उदासी महाराज मठात जावून विधीवत अभिषेक केला. त्यानंतर स्वयं:भू शनीमूर्तीस तेल अर्पण करीत दर्शन घेतले.सरन्यायधीश शरदचंद्र बोबडे हे शनी शिंगणापूर येथे येणार असल्याची माहिती कळताच मंदिर परिसरामध्ये व शिंगणापुरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शनी दर्शनानंतर न्या. बोबडे यांचा देवस्थानच्या वतीने अध्यक्षा अनिता शेटे यांनी शनी प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा व तालुका न्यायालयाचे कार्यालयीन प्रतिनिधी, तहसीलदार रुपेश सुराणा, शेवगाव उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, शिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तमनर यांच्यासह देवस्थान विश्वस्त उपस्थित होते.
सरन्यायाधीश शरदचंद्र बोबडे यांचे शिंगणापुरात शनीदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 3:40 PM