अहमदनगर - साई जन्मभूमी वादाच्या मुद्यावर शिर्डीत बंदला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. दावे-प्रतिदावे, बंद दुर्लक्षित करून साईभक्तांनी दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लावल्या होत्या. साईबाबांवरील भक्तांची श्रद्धा तर शिर्डीवर विश्वासाची मोहोर उमटवल्याचे दर्शन झालं. अखेर, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासानंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला आहे.
साईंच्या जन्मस्थळाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी बैठक बोलावली आहे. तर, साईभक्तांना शांत राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यानंतर, शिर्डीकरांनी पुकारलेला बंद मागे घेतल्याची घोषणा केली. साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी शहर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले होते. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर उघडे असून, दुकाने, बाजार मात्र बंद असल्याचे पाहायला मिळाले. तर या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी झाले होते. साईबाबा जन्मस्थळाचे पाथरीसह आठही दावे तथ्यहीन व दिशाभूल करणारे आहेत़. पाथरीला निधी देण्यास विरोध नाही, मात्र जन्मस्थळाच्या उल्लेखाला तीव्र आक्षेप आहे़. मुख्यमंत्री आपले विधान मागे घेत नाहीत, तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंद राहील, असा निर्णय ग्रामसभेत झाला़ होता.
शिर्डीकरांनी बंद अगोदरच जाहीर करूनही भाविकांच्या गर्दीवर कोणताही परिणात झालेला नाही. दर्शन व्यवस्था सुरूळीत सुरू आहे. संस्थान प्रसादालय रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सूरू होते. त्यानंतर पहाटे एक वाजेपासूनच प्रसादालयाचा भटारखाना सुरू झाला होता. रोज सकाळी १० वाजता प्रसादालय सुरू होते. आज सकाळी साडेनऊ वाजताच सुरू करण्यात आले होते. दरम्यान, शिर्डीकरांनी हा बंद मागे घेतला असून उद्या मुख्यमंत्री यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती आहे.