संगमनेर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम खारघर येथे झाला. शिंदे आणि फडणवीस सरकारने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. धर्माधिकारी यांच्यावर श्रद्धा असलेले लाखो भाविक त्यानिमित्ताने आले होते. उन्हाचा प्रचंड तडाखा होता, ४६ डिग्री पेक्षा जास्त तापमान होते. एवढ्या उन्हात लाखो भाविक बसल्याने उष्माघातामुळे खूप भाविक आजारी पडले. मृतांचा जो आकडा येतो आहे, त्यापेक्षा अधिक मृतांची संख्या त्यात आहे. महाराष्ट्र शासनाकडून गुन्हा घडला त्यांनी लोकांच्या भावनेचा विचार करून नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. असे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
खारघर येथील दुर्घटनेच्या संदर्भात सोमवारी (दि. २४) आमदार थोरात यांनी संगमनेरात पत्रकार परिषद घेतली. आमदार थोरात म्हणाले, या सर्व कार्यक्रमावर आमचा आक्षेप आहे. कोट्यावधी रुपयांची खर्चाची तयारी होती. भाविकांना तुम्ही बोलवले होते. तर या सर्वांना तुम्ही उन्हात कसे बसविले. सावली करण्याचे नियोजन का केले नाही. मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात असे निर्देशनास आले की, अनेकांच्या पोटात कितीतरी तास अन्न, पाणी गेलेले नव्हते. तुम्ही सरकार म्हणून नियोजन करत असताना बेफिकिरी आणि निष्काळजीपणा दाखवला.
एवढेच नाही तर क्रूरता सुद्धा त्यामध्ये दिसते आहे. याला जबाबदार पूर्णपणे महाराष्ट्र शासन आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार आहे. व्हीआयपींचे करिता सगळ्या सुखसोयीसाठी करता आणि आम जनता उन्हात बसवून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होता. याची पूर्णपणे जबाबदारी शिंदे आणि फडणवीस सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्र शासनाकडून गुन्हा घडला त्यांनी लोकांच्या भावनेचा विचार करून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे.