नेवासा : शेतक-यांसाठी सुरु केलेली कर्जमाफी योजना आजही थांबवली नाही. जोपर्यत सर्व शेतकरी कर्जमुक्त होत नाही. तोपर्यत आपण कर्जमाफी योजना थांबवणार नाही. कपाशी बोंडअळीचे नुकसान दिले आहे. आमच्या ४ वर्षाच्या सरकारच्या काळात सर्वात जास्त खरेदी आम्ही केली. शेतक-यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी राज्याची तिजोरी आम्ही खुली केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.शिंगणापूर येथील शेतकरी-वारकरी महासंमेलनाच्या उदघाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.फडणवीस म्हणाले, श्री क्षेत्र शनिशिंगणापूर या पवित्र स्थानी शेतकरी-वारकरी एकत्र आले आहेत. शेतकरी हा वारकरी आहे आणि वारकरी हा शेतकरी आहे. ख-या अर्थाने वारकरी व शेतक-यांनी धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवली आहे.या महाराष्ट्रात शेतक-यांच्या समस्या मोठ्या आहेत. सध्या दुष्काळ समोर आहे. मात्र आम्ही ४ वर्षाच्या कालावधीत आम्ही शेतक-यांच्या पाठीशी आहोत. गेल्या चार वर्षात शेतक-यांच्या खात्यामध्ये ५० हजार कोटी रुपयांची मदत थेट दिली आहे. प्रत्येक अडचणीमध्ये शेतक-यांच्या पाठीमागे आमचे सरकार आहे. हे मागील कोणत्याही सरकार करू शकले नाही. कर्जमाफी योजनेमध्ये एकट्या नगर जिल्ह्यात साडेतेराशे कोटी रुपये मिळाले. राज्यात २१ हजार कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून दिले. हे कोणत्याही सरकार करू शकले नाही.आजही आम्ही कर्जमाफी योजना थांबवली नाही. जोपर्यत सर्व शेतकरी कर्जमुक्त होत नाही. तोपर्यत आपण कर्जमाफी योजना थांबवणार नाही. आज बोंडअळीचे नुकसान दिले आहे. जलयुक्त शिवार योजना राबविली. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली. शेतक-यांना पाणी मिळण्यासाठी आम्ही काम केले. दुधाचे भाव आम्ही वाढविले. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही.तत्पुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील शिंगणापूर येथे आगमन झाले. त्यांनी अभिषेक करून शनी दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.शेतकरी-वारकरी महासंमेलानाचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.यावेळी चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, आमदार गिरीश महाजन, आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे खासदार दिलीप गांधी, संभाजी दहातोंडे होते.याआधीच्या सरकारमधील नेतेच गब्बर झालेआमच्या कोणतयाही संस्था नाहीत. आम्हाला जनतेसाठी राज्य करायचे आहे. प्रामाणिकपणे काम आम्ही करत आहोत. याआधीच्या सरकारने जनतेची चेष्टा केली. स्वत:च्या संस्था मोठ्या केल्या. जनतेच्या जीवावर स्वत: मोठे झाले.