संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याकरिता त्यावेळी घेतलेले सगळेच निर्णय बेकायदेशीर होते. राज्यपालांनी घेतलेले निर्णय सुद्धा बेकायदेशीर होते. सरकार पाडण्यासाठी ही सगळी कृती केली गेली. हे निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्याचे महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे बेकायदेशीर असून नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे. असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर गुरुवारी (दि. ११) आमदार थोरात यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात अगदी स्पष्टपणे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते सरकार पाडण्यासाठी राज्यपाल यांचे निर्णय, विधानसभा अध्यक्ष यांचे निर्णय, फुटीर गटाचा व्हीप हे सर्व बेकायदेशीर होते. सत्तेसाठी कोणत्याही पद्धतीने सरकार पाडण्याचा तो प्रयत्न होता. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर हे सरकार नाही. पक्षांतर बंदीचा कायदा हा यासाठी केला आहे की कोणीही फोडाफोडी करू नये. मूळ शिवसेना पक्षातून फुटलेले आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी आता निपक्षपातीपणे निर्णय घेतला पाहिजे. कारण विधानसभा अध्यक्षपद ही कोणत्याही पक्षाशी निगडित नसून ते स्वायत्त असते.
"नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा"
By शेखर पानसरे | Published: May 11, 2023 2:55 PM