अहमदनगर : पारनेरचा पाणीप्रश्न आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्त्वाखाली सोडविला जाईल, असे खुद्द मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. पाच नगरसेवकांना शिवबंधन बांधल्यानंतर ठाकरे यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसे शिवसेनेच्या मुखपत्रातही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एकप्रकारे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे पारनेर तालुक्याचे नेतृत्त्व आमदार निलेश लंके यांच्याकडे सोपविले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पारनेरमधील नगरसेवकांची पुन्हा घरवापसी झाली असली तरी शिवसेना व राष्टÑवादी यांच्यातील मतभेद संपतील का? याबाबत साशंकता आहे. नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीत हे पक्ष कसे लढणार? याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.पारनेर नगरपंचायतचे शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्टÑवादीत गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले होते. त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने राष्टÑवादीने या नगरसेवकांना पुन्हा स्वगृही पाठविले आहे. दोन्ही पक्षांनी एकदिलाने हा निर्णय घेतला असे दाखविले जात असले तरी तीन महिन्यांवर आलेल्या नगरपंचायत निवडणुकीत आता हे पक्ष कसे लढणार? याबाबत उत्सुकता आहे. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आता भाजपसोबत युती करु शकणार नाही. तसे झाले तर त्यास राष्टÑवादी आक्षेप घेईल. त्यामुळे शिवसेनेला महाविकास आघाडीत समाविष्ट होऊनच ही निवडणूक लढावी लागेल. तसे झाल्यास राष्टÑवादीचे आमदार निलेश लंके व सेनेचे माजी आमदार विजय औटी यांना एकमेकाशी जुळवून घ्यावे लागेल. शिवसेना व राष्टÑवादी स्वतंत्र लढले तर या दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच होईल व थेट ठाकरे यांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला लागेल. त्यामुळे दोघांसमोरही पेच आहे.
लंके प्रथमच चढले मातोश्रीची पायरीराष्टÑवादीचे आमदार असलेल्या निलेश लंके यांचे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी कौतुक करत तुम्हालाच महाविकास आघाडीची धुरा पारनेरमध्ये सांभाळायची असल्याचे उद्गार काढले असल्याचे लंके समर्थकांचे म्हणणे आहे. लंके हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. मात्र, विजय औटी यांच्यासोबत मतभेद झाल्याने ते सेनेतून बाहेर पडून राष्टÑवादीत गेले. ‘सेनेत असताना आपणाला कधीही मातोश्रीवर येता आले नाही. दोन दशकांनंतर बुधवारी ही संधी आपणाला मिळाली’, अशी भावना आमदार लंके यांनी व्यक्त केली आहे.
औटी यांना मातोश्रीचा निरोपच नाही ?शिवसेनेचे नगरसेवक स्वगृही परतत असताना सेनेचे पारनेरचे माजी आमदार विजय औटी मातोश्रीवर उपस्थित नव्हते. त्यांना बोलविण्यात आले नव्हते असे समजते. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या पाच नगरसेवकांनी लेखी पत्र ठाकरे यांना दिले असून त्यात औटी यांच्याबाबत तक्रार केली असल्याचे समजते. मात्र, हे पत्र माध्यमांसमोर उघड करण्यात आलेले नाही.