मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महसूलमंत्री थोरात हे दोन दिवसीय संगमनेर विधानसभा मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. रविवारी (दि.२१) थोरात यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला.
मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविला आहे. या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून सुरू होता. यात केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढत चालला आहे का? याबाबत महसूलमंत्री थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, आता यात वेगळे बोलण्याची आवश्यकता नाही. शेवटी तपास ते करत आहेत. काय सत्य येईल ते पाहू यात. कुणी खरेच चुकले असेल, तर त्याची शिक्षा त्याला होणार आहे.
या प्रकरणात राज्य सरकारला धोका होईल, असे बोलले जाते आहे. असे थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, यात राज्य सरकारला धोका होईल, असे कुठले कारण नाही. कुणी, कुठे चुकीचे वागले असेल, तर तो त्रास त्याच्यापुरता होऊ शकतो.