अहमदनगर : सत्ताधाऱ्यांनी राज्यात विकासकामे केली असतील तर त्यांना वेगळा जनादेश का मागावा लागत आहे?, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढण्यापेक्षा श्वेतपत्रिका काढून राज्यात पाच वर्षांत किती उद्योग आले, राज्याचे कर्ज किती पटीने वाढले, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटलाय का आणि गुन्हेगारीत झालेली वाढ हे एकदा जनतेला सांगावे. मुख्यमंत्र्यांची ही यात्रा म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची कबुलीच आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त महाराष्ट्राचा दौरा करत असलेले डॉ. कोल्हे यांनी बुधवारी (दि़ ७) ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट देत संवाद साधला. कोल्हे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे दुष्काळ अशी अवस्था आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी मतांच्या राजकारणाच्या मागे मंत्री धावत आहेत. आज महाराष्ट्रात सरासरी दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये ज्यांचे कौतुक केले होते त्याच शेतक-याने आत्महत्या केली. अत्याचाराच्या घटनेतील आरोपींच्या शिक्षेची अंमलबजावणी होत नाही यापेक्षा दुर्दैव काय असू शकते? केंद्रातील सरकार बहुमताच्या बळावर नवीन कायदे संमत करत आहे. हे करत असताना विरोधी पक्षांची भूमिकाही विचारात घेणे गरजेचे आहे. काही कायद्यांबाबत आक्षेपाचे मुद्दे असतात. त्यावर व्यापक चर्चा होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही. वैद्यकीय क्षेत्राबाबत घेतलेला निर्णय तसेच माहितीचा अधिकार हा सक्षम कायदा कमजोर करण्याचा सरकारने घातलेला घाट असे अनेक आक्षेपाचे मुद्दे नमूद करता येतील. सत्ताधा-यांनी विरोधकांना शत्रू पक्ष न समजता त्यांचीही बाजू समजून घ्यावी. जम्मू-काश्मिर राज्यातील ३७० हे कलम केंद्राने रद्द केले. या कृतीने जर तेथील विकास होणार असेल तर या निर्णयाचे स्वागत आहे. पण ही प्रक्रिया राबविताना तेथील जनतेला विश्वासात घेणे गरजेचे होते. केंद्राने हा निर्णय तेथील जनतेवर लादलेला दिसत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब योग्य नाही असे सांगत कोल्हे म्हणाले, तिहेरी तलाक कायद्यातून मुस्लिम महिलांना दिलासा मिळेल मात्र त्यांच्या पुढील भविष्याचाही विचार व्हावा. सर्वच समाजातील पीडित महिलांची मोठी संख्या आहे. महिलांबाबत कायदा करताना सर्वव्यापक विचार होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले होते. येणा-या काळात असेच राज्य निर्माण व्हावे हिच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. म्हणूनच शिवस्वराज्य यात्रा हे नाव घेऊन जनतेपर्यंत जात आहे, असे कोल्हे म्हणाले.‘त्या’ नेत्यांबद्दल सत्ताधा-यांची भूमिका काय?दुस-या पक्षातून सत्ताधा-यांमध्ये काही नेते सामील झाले आहेत़ सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून पक्षांतर घडविले जात आहे. सत्ताधा-यांनी ज्यांना आपल्या पक्षात घेतले आहे. त्यांच्यावरच आधी आरोप केलेले आहेत. पक्षांतरामुळे हे आरोप संपणार आहेत का? याबाबत सत्ताधा-यांनी स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे, असे कोल्हे म्हणाले.
ईव्हीएमबाबत मोठा संभ्रमईव्हीएम मशीनबाबत सर्वांच्याच मनात संभ्रम आहे. गावोगावी नोंद झालेली मते आणि पडलेली मते यांची बेरीज जुळत नाही. अनेक ठिकाणाहून अशा तक्रारी आहेत. म्हणून ईव्हीएमला सर्वपक्षीयांचा विरोध आहे. आपण केलेल्या कामाबाबत सत्ताधा-यांना विश्वास असेल तर सरकारने ईव्हीएम टाळून बॅलेट पेपरचा मार्ग स्वीकारावा, असे कोल्हे म्हणाले.दोन यात्रेत फरकमहाजनादेश यात्रेला राज्यात विविध ठिकाणी काळे झेंडे दाखविले जात आहेत. शिवस्वराज्य यात्रेचे मात्र ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे. हा फरक या दोन यात्रेतील आहे असे मत कोल्हे यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी पक्षांतर केले म्हणून पक्षाला खूप मोठे भगदाड पडले आहे आणि खूपच चिंतेचे वातावरण आहे अशी परिस्थिती नाही. पक्षाची वीट मजबूत आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांनी एकेकाळी युवा फळी उभी केली होती. आज ते युवक पक्षात ज्येष्ठ आणि अनुभवी म्हणून काम करत आहेत. नेत्यांसह निष्ठावंत कार्यकर्ते पक्षासोबत आहेत़ म्हणूनच राष्ट्रवादी पुन्हा एकदा सक्षमपणे उभारी घेईल.काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे सहकार क्षेत्रात मोठे काम आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. सध्या पानगळ सुरू आहे. येत्या काळात मात्र राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षालाही नवीन पालवी फुटणार आहे, असा आशावाद कोल्हे यांनी व्यक्त केला.