साहेबराव नरसाळे अहमदनगर : चंदेरी दुनियेचा भक्कम पाया लाभलेल्या मुंबई, पुणे, कोल्हापूर या शहरातील बालकलाकारांची मक्तेदारी नगरच्या बालकलाकारांनी मोडीत काढली असून, शिर्डीच्या निहार हेमंत गिते याने ‘बॉलिवूड’ गाजवून नगरी दम दाखविला आहे़ त्याच्याशिवाय सर्वज्ञा अविनाश कराळे, आदेश आवारे, तेशवानी वेताळ, साहिल झावरे यांनी विविध चित्रपटांमध्ये दमदार भूमिका करुन रुपेरी पडद्यावर नगरी ठसा उमटविला आहे.
निहार हेमंत गितेइंडियाज् बेस्ट ड्रामेबाज, लिटील चॅम्प असलेल्या शिर्डीच्या निहार गिते याने बॉलिवूड गाजवले आहे़ ‘कालाय तस्मै नम:’ ही टीव्ही मालिका तसेच बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट देणारे मोहित सुरी यांच्या ‘द व्हिलन’ या हिंदी चित्रपटात तर प्रियांका चोप्रा निर्मित ‘काय रे रासकल्ला’ या मराठी चित्रपटातून निहारने रुपेरी पडदा गाजवला आहे़ त्याशिवाय टीव्ही चॅनलवरील विविध रिअॅलिटी शो आणि नामांकित कंपन्यांच्या टीव्हीवरील जाहिरातींमध्ये प्रमुख बालकलाकार म्हणून अवघ्या देशभरात निहार पोहोचला़ त्याच्या टॅलेंटची दखल घेत विविध कंपन्यांकडून त्याला लाखो रुपयांची स्कॉलरशीपही मिळाली आहे़ तसेच चित्रकला हा त्याच्या आवडीचा विषय़ त्याच्या चित्रप्रदर्शनाची इंडिया बूक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून, मिथुन चक्रवर्ती, रितेश देशमुख, श्रद्धा कपूर अशा अनेक बॉलिवूड दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर करणारा निहार हा नगरचा एकमेव हुरहुन्नरी बालकलाकार आहे़
समीक्षा रितेश साळुंकेलहानपणापासूनच नाट्य अभिनयाचे बाळकडू मिळालेली समीक्षा भरतनाट्यम विशारद आहे. ‘एल.ओ. सी.’ आणि ‘बापू एक खोज’ या नाटकांतून बालकलावंताची भूमिका समीक्षाने केली असून दोन्ही नाटकांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे़ पंढरपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील बालनाटकात सर्वोत्कृष्ट अभिनयाबद्दल पारितोषिक देऊन तिचा गौरव करण्यात आला.
साहिल क्षितिज झावरेअत्यंत कमी वयात राज्य शासनाचे अभिनयासाठीचे पारितोषिक मिळविणारा हा बालकलाकाऱ साहिल झावरे याने ‘आनंदाचे गोकूळ, मुलाकात’ या बालनाट्यांमध्ये दमदार अभिनय केला़ त्याच्या अभिनयाची दखल घेऊन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने त्याला या दोन्ही बालनाट्यांतील अभिनयासाठी पारितोषिक देऊन गौरविले़ तसेच ‘माझं नाव शिवाजी’ या मराठी चित्रपटातही साहिलने भूमिका साकारली आहे.
आदेश बाजीराव आवारेनगर तालुक्यातील इमामपूर या छोट्याशा गावात जन्मलेल्या आदेश आवारे याला लहानपणापासून अभिनयाची आवड़ त्याने एकपात्री प्रयोगांबरोबरच विविध नाटके, लघुपटांमध्येही भूमिका साकारल्या़ आदेश अभिनित ‘नुंजूर’ या लघुपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवडही झाली़ तसेच ‘चरणदास चोर’, ‘घुमा’ या मराठी चित्रपटांमधून आदेश आवारे याने रुपेरी पडद्यावर चुणूक दाखविली़
मार्दव सुनील लोटकेघरातूनच नाट्य अभिनयाचे धडे मिळालेला मार्दव लोटके. सलग तीन वर्ष महाराष्ट्र शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक मिळवून हॅट्ट्रीक करणारा महाराष्ट्रातील तो पहिलाच बालकलाकार ठरला आहे़ गायन, तबला वादनात हातखंडा असलेला मार्दव शाळेतही अत्यंत हुशार आहे़ त्याने चौथीत महाराष्ट्र सरकारची स्कॉलरशीप मिळविली आहे़ ‘भेट, राखेतून उडाला मोर, एलओसी’ या नाटकांमधून त्याने अभिनयाची छाप सोडत अभिनयासाठी पारितोषिक पटकावले आहे.
तेशवानी वेताळरांजणगाव वेताळ (ता़ पारनेर) येथील बालकलाकार म्हणून गाजलेल्या तेशवानी वेताळ हिने अनेक टिव्ही मालिका, चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली़ ‘झेंडा स्वाभिमानाचा, पतंग, पॉकेटमनी, आयटमगिरी, घुमा या चित्रपटांतून तेशवानी महाराष्ट्रभर पोहोचली़ तसेच ‘तू माझा सांगाती, बे दुणे चार, बोधीवृक्ष’ या टीव्ही मालिकांमधूनही तेशवानीने आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली आहे़ त्याशिवाय विविध लघुपट आणि टीव्हीवरील जाहिरातींमध्ये तेशवानी चमकली आहे़ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज गौरव या प्रतिष्ठित पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला आहे.
सर्वज्ञा अविनाश कराळे‘नगरी गंगुबाई’ म्हणून राज्यभरात नावलौकिक मिळविलेल्या सर्वज्ञा कराळे हिने अनेक बालनाट्यांमधून पारितोषिके पटकावली आहेत़ भ्रष्टाचारी राजकारणावर भाष्य करणारा ‘राजकीय पुढारी’, पर्यावरणावर आधारित ‘साळू’, लावणी सम्राज्ञीची कैफियत मांडणारी ‘मैनावती’ या तिच्या लौकिकास साजेशा व्यक्तिरेखा़ महाराष्ट्र शासनाने तिला अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे़ मुलुंड (मुंबई) येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात विशेष निमंत्रित बालकलाकार सर्वज्ञाने ‘गंगुबाई’ हा एकपात्री प्रयोग सादर केला़ या ‘गंगुबाई’चे राज्यभर अनेक प्रयोग झाले आहेत. ‘इखमरण’ या चित्रपटातही तिने भूमिका साकारली आहे.