शेवगाव : येथील दुहेरी हत्याकांडातील मुलाचा मृत्यू डोक्यात टणक वस्तू मारल्याने झाला असावा, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. महिलेचे शिर नसल्याने तिचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शवविच्छेदन अहवालातूनही स्पष्ट झाले नाही. त्या दोघांच्या मृत्यूनंतर एखाद्या प्राण्याने शरीराचा काही भाग खाल्ला, असे अहवालात नमूद केले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी दिली.
महिलेचे शिर शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळसभोवतालचा परिसर सोमवारी सकाळी पिंजून काढला. मात्र, गायब असलेले शिर सापडले नाही. हत्या कोणी व का केल्या, याच्या तपासासाठी शेवगाव पोलिसांचे एक पथक नाशिककडे, तर दुसरे पथक मध्यप्रदेशातील चिचोडिया गावी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नाशिक, तर दुसरे पथक शेवगाव परिसरात रवाना झाले आहे.
रविवारी दुपारी दोनच्या सुमारास दोघांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नाहीत. दरम्यान, रविवारी रात्री पोलीस अधीक्षक मनोजकुमार पाटील हे रात्री साडेअकराच्या सुमारास शेवगावात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांना सूचना केल्या. ते रात्री एकच्या सुमारास अहमदनगरकडे रवाना झाले. त्या महिलेचे शिरविरहित धड मिळून आल्याने, तसेच त्यांची ओळख पटत नसल्याने पोलिसांना तपासाची दिशा ठरवताना अडथळे निर्माण झाले. या महिलेच्या मृतदेहाचा हात प्रथमदर्शनी वन्यजीव प्राण्याने खाल्ला असावा अशी शक्यता असल्याने त्यादृष्टीने पोलिसांनी शोधकामी वन विभागाचे सहकार्य घेतले. घटनास्थळापासून एका प्राण्याच्या पायाच्या खुणा दिसून आल्याने त्याचे मोबाइलमध्ये छायाचित्रे घेऊन पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी सहायक वन संरक्षक सुनील पाटील यांना पाठविले होते. त्यांनी ते ठसे ‘तरस’ या प्राण्याचे असावे, असे सांगितले.
दरम्यान, पाथर्डी-शेवगावचे वन क्षेत्रपाल शिरीषकुमार निरभवणे, वनपाल पांडुरंग वेताळ, अप्पा घनवट यांनी घटनास्थळी भेट देऊन दिसून आलेल्या त्या ठशांची पाहणी केली असता त्यांनी ते ठसे कुत्र्याचे असल्याचे सांगितले.
पहाटे सहापासून ३५ स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी दुपारी बारापर्यंत परिसरात महिलेचे शिर शोधले. मात्र, शिर सापडले नाही. यावेळी उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे आदी उपस्थित होते.