हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे (वय २५) अल्मश ताहीर शेख (वय १८), मुसाहीब नासीर शेख (वय २१), आसिफ हिनायत शेख (वय २४) व फैरोज रशिद शेख (वय २५, सर्व रा. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अमरावती येथील मोनिका लुणिया या १७ फेब्रुवारी रोजी त्यांचा चार वर्षांचा नातू नयन याला फिरायला घेऊन घराबाहेर आल्या होत्या. यावेळी मोटारसायकलवरून आलेली एक महिला व पुरुषाने नयन याला पळवून नेले. या घटनेनंतर अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहरणकर्त्यांबाबत मिळालेल्या माहितीवरून अमरावती पोलिसांचे एक पथक तपासासाठी नगरमध्ये दाखल झाले. दरम्यान या घटनेबाबत अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना माहिती दिली होती. अधीक्षकांच्या सूचनेनुसार या मुलाच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या मुलाचे अपहरण नगर येथील हिना शेख व अल्मश शेख यांनी केल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यानंतर पथकाने या दोघांसह मुसाहीब शेख याला नगर शहरातून ताब्यात घेत चौकशी केली तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अपहरण झालेल्या नयन याला असिफ शेख व फैरोज शेख यांच्याकडे दिले होते. हे दोघे नयनला घेऊन कल्याण रोडने पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी दुपारी पाठलाग करून या दोघांना कल्याण रोडवरील जखणगाव परिसरात ग्रामस्थांच्या मदतीने पकडले. यावेळी आरोपींच्या तावडीतून नयन याची सुखरूप सुटका केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, सहायक निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहायक फौजदार मन्सूर शेख, हेड कॉस्टेबल दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब कुरुंद, संदीप घोडके, सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी यांच्यासह अमरावती स्टेशनचे सहायक निरीक्षक कृष्णा मापारी व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
नयन म्हटला...मला मम्मीकडे जायचंयं
हिना शेख हिचे अमरावतीत नातेइवाईक राहतात. तिला लुणिया कुटुंबीयाबाबत सर्व माहिती होती. त्यामुळे तिने खंडणीसाठी नयन याच्या अपहरणाचा कट रचला. चार वर्षांच्या निरागस नयन याला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. पोलिसांनी नयन याची आरोपींच्या ताब्यातून सुटका केली तेव्हा ‘मला आता मम्मीकडे जायचे आहे’ असे ते म्हणत होता. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी गप्पा मारल्यानंतर नयन आनंदीत झाला.
फोटो १९ आरोपी
अमरावती येथून अपहरण झालेल्या नयन याची पोलिसांनी नगरमध्ये सुटका करत पाच आरोपींना अटक केली.