अहमदनगर : आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे तरुण शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर सुरुडीपासून जवळच असलेल्या किन्ही (काकडेची) येथे बिबट्याने दुसरा बळी घेतला आहे. शुक्रवारी (ता.२७) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेतातील विहिरीवर पाणी देण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय स्वराज ऊर्फ यश सुनील भापकर या बालकावर झेप घालून उचलून नेले. काही वेळात परिसरात या बालकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती कळताच सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे वनविभागाला देताच वनविभागाचे अधिकारी सिरसाट अवघ्या १५ मिनिटात किन्हीत पोहोचले. त्या पाठोपाठ आष्टीचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस ही घटनास्थळी दाखल झाले. आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा उच्छाद सुरू आहे. मोराळा पंचायत समिती गणाच्या सदस्या आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांना बिबट्याने मंगळवारी भरदिवसा शेतात हल्ला करून ठार केले. शेतात तुरीला पाणी घालत असताना ही घटना घडली. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत, तोच शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्वराज हा मूळचा खराटवाडी (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील रहिवासी आहे. तो दिवाळीनिमित्त आजोळी आजीकडे आला होता. शुक्रवारी तो काकाबरोबर शेतातील तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठीची विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेला होता. यावेळी तुरीच्या पिकातून आलेल्या बिबट्याने झेप घेत काकासमोर स्वराजला मानेला पकडून उचलून नेले. काकाने आरडाओरडा केला. त्यानंतर शोधाशोध केली असता जवळच्याच शेतात बोरीच्या झाडाखाली स्वराजचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. आजोळी आला मृत्यू स्वराज भापकर हा श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी असून, तो आजोळी काकडेची किन्ही येथे दिवाळीनिमित्त आलेला होता. स्वराजचे वडील शेतकरी आहेत. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. मावशीच्या पतीबरोबर (काका) तो शेतात आला होता. मोटार चालू करताना अचानक तुरीच्या पिकातून झेप घेत बिबट्याने त्याला काकासमोर उचलून नेले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. |
आष्टीतील बिबट्याच्या हल्ल्यात श्रीगोंदा तालुक्यातील मुलाचा बळी; काकाबरोबर गेला होता शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:11 PM