मिरजगाव : रोडरोमिओकडून होणाऱ्या सततच्या छळामुळे अल्पवयीन मुलगी चिठ्ठी लिहून आत्महत्येच्या विचारात असतानाच आईने प्रसंगावधानता दाखविल्याने तिचा जीव वाचला. त्यानंतर रोडरोमिओची ग्रामस्थांनी धुलाई केली. तसेच कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर-सोलापूर महामार्गावर पोलीस चौकी समोरच अर्धा तास रास्तारोको केला.हा रोडरोमिओ येथील शाळेत शिकणाºया अल्पवयीन मुलीची येण्या-जाण्याच्या मार्गावर पाठलाग करून छेडछाड करीत होता. याबाबत घरी सांगितल्यास शाळा बंद होईल, या भीतीने या मुलीने हा प्रकार घरी सांगितला नाही. हा प्रकार असह्य झाल्याने बुधवारी मध्यरात्री या मुलीने चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची मानसिक तयारी केली. पण एवढ्या रात्री आपली मुलगी काय करतेय? असे लक्षात आल्यानंतर तिच्याजवळ जाऊन विचारपूस केली. तेव्हा खरा प्रकार समोर आला. गुरूवारी पालकांनी याबाबत पोलिसात व शाळेत तक्रार दिल्यानंतर ही वार्ता गावात वाºयासारखी पसरली. त्यातूनच शहरातील तरूणांनी रोडरोमिओला चांगला चोप देऊन शहरातून धिंड काढून पोलिसांच्या हवाली केले. या घटनेमुळे अनेक पालक पोलीस चौकीजवळ जमा झाले. वारंवार होणाºया छेडछाडीच्या घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होण्यासाठी पोलीस चौकीसमोरच पालक, ग्रामस्थांनी दुपारी अहमदनगर-सोलापूर महामार्ग अर्धा तास रोखून धरला. यावेळी अनेकांनी अशा प्रवृत्तींना वेळीच आळा न घातल्यास कोपर्डीची पुनर्रावृत्ती होऊ शकते. येत्या आठ दिवसांत याबाबत ठोस कारवाई न केल्यास तालुका बंद ठेवण्यात येईल, असा इशारा देत रास्तारोको मागे घेण्यात आला.मिरजगावमधील छेडछाडीबाबत ‘लोकमत’ने गुरूवारीच वृत्त प्रसिद्ध केले होते. दोन दिवसापूर्वीच पोलिसांनी शाळेत प्रबोधन वर्ग घेतले होते. पोलिसांनी तक्रारीची तक्रारी वाट न पहाता अशा रोडरोमिओचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शहरात ठराविक टवाळखोर असून वारंवार त्यांच्याविषयीच तक्रारी येत असून सुध्दा कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढून मुली दहशतीखाली वावरत आहेत.