लोकमत न्यूज नेटवर्कसामान्य मुलांपेक्षा उशिरा वाढ होणे म्हणजे डाऊन सिंड्रोम. असा आजार असलेल्या मुलांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. सर्वच बाबींमध्ये मुलांची वाढ उशिरा होत असली तरी त्यांच्यासाठी खास बौद्धिक विकासाचे कार्यक्रम दिल्यास ते आपल्या जीवनात प्रगती करतात. २१ मार्च हा वैद्यकीय क्षेत्रात ‘जागतिक डाऊन सिंड्रोम दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त येथील बालविकास व बालरोगतज्ज्ञ डॉ. सुचित तांबोळी यांच्याशी साधलेला हा संवाद.हा आजार नेमका काय आहे?डाऊन सिंड्रोम हा गुणसुत्रांमधील दोषांमुळे निर्माण होणारा जन्मजात आजार आहे. आपल्या शरीरामध्ये २३ गुणसूत्रांच्या जोड्या असतात. हा आजार २१ व्या गुणसुत्रावर जोडी ऐवजी ३ गुणसूत्रे आल्याने निर्माण होतो. यामुळे याला ‘ट्रायसोमी’ असेही म्हणतात. डाऊन सिंड्रोमचे वर्णन जॉन लँगडन हेडॉन डाऊन यांनी १८६६ मध्ये प्रथम केले होते. १९५९ मध्ये लेज्यून यांनी या डिसआॅर्डरचा गुणसूत्र आधार शोधला होता. डाऊन सिंड्रोम हा आजार भारतात जवळजवळ ९२० पैकी एका जन्मलेल्या बालकाला असू शकतो.
कशामुळे हा आजार होतो?नात्यातील लग्न, मागील गर्भपात, औषधे आणि रसायनांचा पालकांशी संपर्क, तंबाखू आणि वडिलांकडून अल्कोहोलचा वापर हे डाऊन सिंड्रोमसाठी धोकादायक घटक असल्याचे दिसून आले. आईचे वय ३५ पेक्षा जास्त असेल तर दर ८० जन्मामागे १ मुल डाऊन सिंड्रोमचे असते. हा आजार नवीन तंत्रज्ञानाने आता गर्भ १२ आठवड्याचा असतांनाच ओळखता येतो.
कसा ओळखावा हा आजार?चेहºयाची विशिष्ट ठेवण, सपाट चेहरा, दोन डोळ्यांमध्ये अजून एक डोळा मावेल एवढे अंतर, नाकाचा सपाट पूल, वरच्या पापणीजवळ असेलेली त्वचेची घडी. नाकापासून कानापर्यंत पट्टी लावल्यास सामान्यत: एक तृतीयांश कान या रेषेच्यावर तर दोन तृतीयांश कान रेषेखाली असतो. परंतु डाऊन सिंड्रोममध्ये संपूर्ण कान या रेषेच्या खाली असतो. लहान तोंड, जीभ, उंच कमानी टाळू, प्रथम आणि द्वितीय बोटे दरम्यान विस्तृत अंतर, शिथील स्नायू आणि बौद्धिक दोष आढळून येतात. सामान्य मुलांपेक्षा या मुलांची वाढ सर्वच बाबतीच उशिरा होते.
आई हिच खरी उपचारतज्ज्ञ लवकर हस्तक्षेप उपचार पद्धतींमध्ये पहिल्या सहा वर्षात या मुलांच्या मोठ्या स्नायूंचा विकास, लहान स्नायूंचा विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, व्यक्त भाषा विकास आणि ग्रहण भाषा विकास या सहा क्षेत्रांमध्ये योग्य त्या खेळणी व वातावरणाद्वारे विकास केला जातो. आई हिच बाळाची उपचारतज्ज्ञ मानून व्यायामतज्ज्ञ व भाषा उपचारतज्ज्ञ यांच्या सहाय्याने त्रिवेंद्रम बालविकास कार्यक्रम, पोर्टेज कार्यक्रम योग्य तज्ज्ञ मार्गदर्शकाद्वारे दिल्यास या मुलांच्या विकासात क्रांती घडू शकते. बरीच मुले व्यवसायात, खेळात उत्तम नाव कमवलेली, व्यवहारात यशस्वी झालेली आहेत. या मुलांना शाळेत वेगळ्या पद्धतीने शिकवावे लागते. त्यांना जेथून समजेल तेथून सुरुवात करावी लागते.
ही मुले संगीतात होता रममाणपहिल्या दीड वर्षांमध्ये मेंदूची वाढ ८५% होते. या वयात बौद्धिक विकासाचा कार्यक्रम दिल्यास त्याचे दूरगामी परिणाम दिसतात. ही मुले संगीतात जास्त चांगली रममाण होतात. त्यांना शिकवितांना तालबद्ध संगीताचा वापर करायला हवा.
डाऊन सिंड्रोम असलेली मुले जन्मत: ओळखू येऊ शकतात. २०१६ च्या दिव्यांग कायद्यानुसार अशा मुलांना शैक्षणिक सवलती मिळतात. त्यांना वेगळ््या पद्धतीने शिकविल्यास ते जीवनात क्रांती करू शकतात. या मुलांची सर्वच बाबीत उशिरा वाढ होते. अशा मुलांना बौद्धिक विकासाचे कार्यक्रम द्यावे लागतात. - डॉ. सुचित तांबोळी