श्रीगोंदा : गणेशा येथील नवभारत विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शुभम व अक्षय उघडे या बंधूंना पोलिसाने शिक्षणासाठी दत्तक घेऊन पितृछत्र दिले. श्रीगोंदा फॅक्टरी येथील राजेंद्र उघडे यांची शुभम व अक्षय ही दोन मुले नवभारत विद्यालयात इयत्ता आठवी व नववीत शिकत आहेत. पोटासाठी भटकंती करणाऱ्या राजेंद्र उघडे यांचे काही दिवसापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. मुलांना शाळेत पाठवून पोट कसे भरावे? असा प्रश्न मुलांच्या आईला पडला. घरची आर्थिक नाजूक स्थिती पाहून मुलांचे शिक्षण कसे करावे? असा प्रश्न या माऊलीला पडला. व तिने तडक शुभम व अक्षयला शाळेतून काढण्यासाठी नवभारत विद्यालय गाठले. तिने मुख्याध्यापक सुनील गिरमकर यांना आपली कैफियत ऐकविली. हे ऐकून ते गहिवरले. व त्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे सैरभर झालेल्या माऊलीला आधार दिला. व त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला. माऊलीची ही दर्दभरी कहाणी ऐकून इतरही गहिवरले. (तालुका प्रतिनिधी)रेल्वे पोलिसात काम करणारे अमोल साळवे यांना या बेघर कुटुंबाची माहिती कळाल्यानंतर ते दु:खित झाले. त्यानंतर त्यांना स्वत:चे खडतर बालपण आठवले व त्यांनी भटक्या समाजातील शुभम व अक्षयला शिक्षणासाठी पितृछत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी शुभम, अक्षयला स्वखर्चाने शालेय साहित्य व गणवेश घेऊन दिले. शैक्षणिक साहित्य व गणवेश पाहून शुभम, अक्षय या भावांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. आर्थिक परिस्थितीमुळे शाळेपासून वंचित रहाण्याची वेळ आलेल्या या बंधूना शाळेची दरवाजे खुली झाली.
मुलांना मिळाले पितृछत्र
By admin | Published: June 26, 2016 12:29 AM