अहमदनगर : भरदिवसा दुकानदारांना लुटल्याची घटना ताजी असतानाच शहरातील पाईपलाईन रोड परिसरात गुंडांनी व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला मारहाण करत ९० हजार रुपये हिसकावून नेले. २२ मार्च रोजी रात्री दहा वाजता ही घटना घडली.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात ठेकेदार अमर देवीदास बोरा (रा. तपोवन रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आठ अनोळखी इसमांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरा हे २४ मार्च रोजी रात्री त्यांच्या ऑफिसकडे जात असताना पाईपलाईन रोडवरील यशोदा नगर येथील मोकळ्या मैदानात तोंडाला कपडा बांधलेल्या गुंडांनी त्यांना अडवून मारहाण केली. यावेळी बोरा यांच्या मोपेड गाडीचीही तोडफोड करून ९० हजार रुपये हिसकावून नेले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक गायकवाड हे पुढील तपास करत आहेत.