अहमदनगर : बँकेतून काढलेल्या पैशांची बॅग हिसकावून पळ काढणारे दोघे चोरटे सराईत गुन्हेगार असून ते गुजरातमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयातील उपचार संपल्यानंतर दोघांनाही कोतवाली पोलिसांनी अटक केली असून विविध जिल्ह्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.शनिवारी झालेल्या या घटनेत जमावाने चोप दिल्याने दोघे चोरटे जखमी झाले होते. ते नावे सांगण्यासही नकार देत होते. कोतवाली पोलिसांनी त्यांना सोमवारी अटक केल्यानंतर त्यांची नावे निष्पन्न झाली. मयूर दिनेश बजरंगे आणि विघ्नेश दिनेश घाशी (रा.कुबेरनगर, अहमदाबाद, गुजरात) अशी त्यांची नावे आहेत, असे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी सांगितले. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून विविध राज्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांनी नगर जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी चोरी केल्याची शक्यता असून त्यादृष्टीने कसून तपास सुरू असल्याचे रंजवे यांनी सांगितले.एम.आय.डी.सी.तील कामगार ठेकेदार बाबुराव भानुदास बडे यांनी शनिवारी मार्केटयार्ड भागातील मर्चंटस् बँकेतून अडीच लाख रुपये काढले. रक्कम त्यांनी त्यांच्या पत्नीकडे दिली. ते दोघेही दुचाकीवरून पैसे घेऊन जात असताना दोन अज्ञात युवकांनी बडे यांचा पाठलाग केला. यावेळी बडे यांच्या पत्नीने प्रसंगावधान राखत बॅग पक्की धरली. यामध्ये चोरट्यांना हिसका बसल्याने ते खाली पडले. त्यानंतर त्यांना जमावाने चोप देवून पोलिसांच्या हवाली केले होते. दोघा चोरट्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार संपल्यानंतर त्यांना कोतवाली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. बँकेतून जास्तीची रक्कम काढताना ग्राहकांनी पोलिसांशी संपर्क साधल्यास त्यांनाा संरक्षण देण्यात येईल,असे पोलिसांनी सांगितले़(प्रतिनिधी)
गुजरातमधील चोर नगरमध्ये
By admin | Published: September 16, 2014 1:05 AM