अहमदनगर: शहरातील बोल्हेगाव व नागापूर परिसरातील पाणीपुरवठा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने महिलांसह नागरिकांनी शुक्रवारी (दि.३) महापालिकेच्या दरात माठ फोडून आंदोलन केले. नगरसेवक कुमार वाकळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मनाच्याढिसाळ कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी बोलताना नगरसेवक वाकळे म्हणाले नागापूर, बोल्हेगावचा पाणी प्रश्न प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तीव्र स्वरूपाचा बनला आहे. आठ ते दहा दिवसांपर्यंत पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. नगरसेवकांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. प्रभागातील नागरिकांनी फेज टू पाणी योजनेचे कनेक्शन घेण्यासाठी पैसे भरले. मात्र त्यांना त्याद्वारे पाणी दिले जात नाही. फेज टू योजनेचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त आहे. दुरुस्त करण्यासाठी महापालिका साहित्य उपलब्ध करून देत नाही. येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर शहराला इतर ठिकाणी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून टाकली जाईल, असा इशारा यावेळी नगरसेवक वाकळे यांच्यासह बोलेगाव येथील नागरिकांनी दिला. दरम्यान उपयुक्त यशवंत डांगे यांनी आंदोलकांशी चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.