अहमदनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेचा रविवारी दुसरा दिवस होता. नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रांवर बाहेर रांगा लावल्या. परंतु, अनेकांनी ऑनलाइन नोंदणीच केलेली नसल्याने केंद्रांवर एकच गोंधळ उडाला होता.
राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीनुसार केंद्र, दिनांक आणि वेळ संबंधितांना दिली जाते. असे असले तरी केवळ आधार कार्ड घेऊन नागरिक लसीची मागणी करत आहेत. महापालिकेच्या माळीवाडा येथील लसीकरण केंद्रासह अन्य चार केंद्रांवर रविवारी नागिरकांनी लस घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. परंतु, राज्य शासनाकडून महापालिकेला दुसऱ्या दिवशी एक हजार डोस प्राप्त झाले होते. हे डोस दुपारी बारापर्यंत संपले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. माळीवाडा येथील केंद्रावर झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांना मोठा जमाव जमलेला दिसतो आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्याने गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेकांनी गर्दी पाहून केंद्रावरून काढता पाय घेतला. शासनाने १८ वर्षांपुढील नागरिकांना नाव नोंदणी करण्यासाठी ॲप खुले केले आहे. त्यावर नोंदणी करणाऱ्यांना लस दिली जाणार आहे. परंतु, अनेकजण नोंदणी न करता नाेंदणी करून लस देण्याची मागणी करताना दिसले. ही नोंदणी लसीकरण केंद्रावर होत नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे नोंदणी करण्याची मागणी होऊ लागल्याने लसीकरण थांबविण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला असून, नागरिकांनी ॲपवर नोंदणी करून दिलेल्या वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
....
राज्य सरकारची लस
केंद्र सरकारने ४५ वर्षांपुढील ,तर राज्य सरकारने १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी लस उपलब्ध करून दिलेली आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांना आधार कार्ड घेऊन गेल्यानंतर लस मिळते. परंतु, १८ वर्षांपुढील नागरिकांना ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. ॲपवर नोंदणी केल्यानंतर केंद्राचे नाव, दिनांक आणि वेळेबाबत नागिरकांना मेसेज येतो. त्यानुसार नागरिकांनी संबंधित केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. परंतु, नोंदणी करताच नागरिक गर्दी करत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
....
पोर्टलचा गोंधळ
राज्य शासनाच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्यांना ग्रामीण भागातील केंद्र सुचविले जात आहे. एका तालुक्यातील व्यक्तीला दुसऱ्या तालुक्यातील केंद्रावर जावे लागत असून, शहरातील नागरिकांना ग्रामीण भागातील केंद्र दिले गेले आहे. त्यामुळे नागरिकांचाही गोंधळ उडाला आहे. ज्या केंद्रांचे नाव दिलेले आहे त्याच केंद्रावर लस घ्यावी लागणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
...
- महापालिकेेच्या लसीकरण केंद्रावर कमालीची गर्दी होत आहे. ही गर्दी नियंत्रणात आणणे कठीण झाले असून, नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. नियमांचे पालन करून प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.
- शंकर गोरे, आयुक्त, महापालिका
....
कुणाला कुठे मिळणार लस
४५ वर्षांपुढील नागरिकांना या केंद्रावर मिळणार दुसरा डोस
-तोफखाना आरोग्य केंद्र
-सिव्हिल आरोग्य केंद्र
-कै. गंगाधर शास्त्री आयुर्वेद महाविद्यालय
.....
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देणारे केंद्र
-केडगाव नागरी आरोग्य केंद्र
-जिजामाता आरोग्य केंद्र
-महात्मा फुले आरोग्य केंद्र
-मुकुंदनगर नागरी आरोग्य केंद्र
- नागापूर आरोग्य केंद्र