अहमदनगर : येथील माळीवाडा येथील महात्मा फुले आरोग्य केंद्रावर सोमवारी सकाळी लस न मिळाल्याने नागरिक संतापले. यावेळी मनसेचे नितीन भुतारे यांनी नागरिकांसह आरोग्य केंद्रासमोरच रस्त्यावर ठिय्या दिला. तसेच अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा निषेध केला.
महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रावर सध्या लसीकरण सुरू आहे. सोमवारी लसीकरणासाठी तरुण, ज्येष्ठांची मोठी गर्दी केंद्रावर झाली होती. सकाळी आठपासून दोनशे नागरिक लसीकरण केंद्रावर रांगेत उभे होते. सकाळी अकरा वाजले तरी लसीकरण सुरू झाले नाही. या केंद्रावर पूर्व नोंदणी करून येणारे तरुणही मोठ्या प्रमाणावर रांगेत होते. तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकही उन्हात थांबले होते. लसीकरण करण्यासाठी महापालिकेच्या जुन्या कार्यालयात मंडप टाकण्यात आला असला तरी माळीवाडा येथील आरोग्य केंद्रावरच लस दिली जाते. त्यामुळे तिथे असलेला मंडप अपुरा असून नागरिकांना तासनतास उन्हातच उभे राहावे लागते. उन्हात उभे असलेल्या नागरिकांना अचानकपणे लस मिळणार नाही, असे सांगितले. त्यामुळे नागरिक संतापले. ही माहिती मिळाल्याने मनसेचे नितीन भुतारे कार्यकर्त्यांसह आरोग्य केंद्रावर दाखल झाले. नागरिकांना लस मिळेपर्यंत रस्त्यावरच ठिय्या देण्याचे भुतारे यांनी सांगितले. ते नागरिकांसह रस्त्यावरच बसल्यानंतर तिथे पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
मात्र यावेळी नितीन भुतारे यांनी लसीकरणाबाबत योग्य नियोजन होत नसल्याने महापालिका आयुक्त, आमदार, खासदारांचा निषेध केला.
---
फोटो- ०३ नितीन भुतारे
महापालिकेच्या माळीवाडा येथील आरोग्य केंद्रावर लसीकरण बंद झाल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. यावेळी मनसेचे नितीन भुतारे यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक
आंदोलनात सहभागी झाले होते.