अहमदनगर : मुकुंदनगर येथील रहिवासी असलेले व तांदळाचे व्यापारी निलेश बोरा हे १८ मे पासून बेपत्ता झाले आहेत. याबाबतचा तपास करण्यास तोफखाना पोलीस टाळाटाळ करीत आहेत. याबाबतचा तपास तातडीने करावा, अशी मागणी व्यापारी निलेश यांच्या पत्नी तृप्ती बोरा यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली आहे. निवेदन देण्याच्यावेळी एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले आमदार अनिल राठोड, नगरसेवक सुवेंद्र गांधी, विक्रम राठोड, माजी नगरसेवक संजय चोपडा हे पोलिसांसमोर एकत्र आले होते. बोरा यांच्या पत्नी तृप्ती बोरा यांनी मंगळवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, पती निलेश आणि मुलगा रोहन असे गेल्या २० वर्षांपासून मुकुंदनगर येथे राहत आहोत. बोरा हे तांदळाचे व्यापारी आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून मंगलगेट येथे रामदेव ट्रेडर्सचे दुकान आहे. निलेश हे दर रविवारी व्यापार्यांनी दिलेल्या मालाचे पैसे घेण्यासाठी बाहेरगावी जातात. रविवारी (दि.१८) सकाळी नऊ वाजता निलेश हे राहुरी येथे दिलेल्या मालाचे पैसे किंवा वसुलीसाठी गेले होते. दुपारी एक वाजता घरी येत असल्याचे सांगत असतानाच त्यांचा मोबाईल अचानक स्वीच आॅफ झाला. ते रात्री दहावाजेपर्यंत घरी आले नसल्याचे काळजी वाढली. सर्व नातेवाईकांकडे चौकशीही झाली. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी मिसिंग दाखल करून घेतली, मात्र पोलीस हवालदार बारकाईने तपास करण्यास टाळाटाळ करीत आहेत. बोरा यांच्या जीवाला काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील, याची खबरदारी घ्यावी, असेही तृप्ती यांनी निवेदनात म्हटले आहे. बोरा यांच्यासमवेत निवेदन देण्यासाठी आमदार अनिल राठोड, नगरसेवक सुवेंद्र गांधी, विक्रम राठोड, किशोर बोरा, कमलेश भंडारी. अशोक बोरा, रामशेठ सचदेव, शैलेश मुनोत आदी उपस्थित होते. व्यापारी जितेंद्र भाटिया हत्या प्रकरणात पोलिसांच्या निष्काळजीपणाचाच बळी गेला होता. त्या पार्श्वभूमीवर मतभेद विसरून सेना-भाजपाचे नगरसेवक एकवटले आहेत. राठोड यांनी पोलिसांनाही बोरा यांचा तपास करण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाने गांभीर्याने तपास करावा, अशी राठोड यांनी मागणी केली. (प्रतिनिधी) निलेश बोरा हे दुचाकीवरून राहुरीला गेले होते. त्यांचा रविवारी दुुपारपासून मोबाईल अचानक बंद झाला. त्यांचे कोणाशीही वैर नाही. त्यांच्याकडे कोणत्याही मौल्यवान वस्तु, दागिने असे काहीच नव्हते. ते नेमके कुठे आहेत? याचाच पत्ता नाही. सर्व नातेवाईकांना कळविण्यात आले आहे. खंडणी किंवा अपहरण याची शक्यता कमीच आहे. फक्त ते कुठे आहेत, याचा पोलिसांनी तपास लावावा. -शैलेश बोरा (बेपत्ता व्यापारी निलेश यांचे बंधू) एम.आय.डी.सी.त लोकेशन बेपत्ता असलेले व्यापारी निलेश यांचा मोबाईल बंद आहे. मात्र त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी तपासले असता ते एम.आय.डी.सी.मध्ये असल्याचे समजते. त्या दिशेने पोलिसांनी शोध सुरू केला आहे. मात्र अद्याप पोलिसांना बोरा यांचा शोध लागलेला नाही. त्यांच्या मोबाईलवर नातेवाईक, व्यापारी मित्र, कुटुंबिय यांच्याशिवाय कोणाच्याही मोबाईल कॉल्सची नोंद आढळून आली नाही. त्यामुळे अपहरणाची शक्यता नाही, असे बोरा यांचे कुटुंबिय व पोलिसांनी सांगितले.
नगरचे व्यापारी निलेश बोरा तीन दिवसापासून बेपत्ता
By admin | Published: May 21, 2014 12:25 AM