अहमदनगर : कोट्यवधी रूपयांचे बोगस कर्जवाटपप्रकरणी दाखल गुन्ह्यात शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेने नगर शहर सहकारी बँकेतील सात ते आठ अधिकाऱ्यांची दिवसभर कसून चौकशी केली़ बँक अधिकाºयांकडून कर्जवाटपाचा विषय समजून घेतल्यानंतर पोलीस संचालक व इतर संबंधितांची चौकशी करणार आहेत़बनावट कागदपत्रांच्या परस्पर कर्जवाटप केल्याप्रकरणी डॉ़ रोहिणी भास्कर सिनारे (रा़ राहुरी), डॉ़ उज्ज्वला रवींद्र कवडे (रा़ श्रीरामपूर) व डॉ़ विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या़पोलिसांनी शहर सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह, संचालक, डॉ़ निलेश शेळके व इतर २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला असून, पोलीस उपाधीक्षक प्रांजल सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत़ शनिवारी सोनवणे यांनी बँकेच्या अधिकाºयांची कसून चौकशी केली़ हे अधिकारी येताना कर्जप्रकरणाच्या फाईली सोबत घेऊन आले होते़या गुन्ह्यात चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल झालेले व बँकेच्या कर्ज विभागातील कर्मचाºयांना नोटीस बजावली आहे़ पोलीस बोलावतील तेव्हा संबंधितांना चौकशीसाठी उपस्थित रहावे लागणार आहे़शेळकेच्या घरावर चिटकविली नोटीसकर्जघोटाळ्याप्रकरणी गुन्ह्यात नाव असलेला डॉ़ निलेश शेळके याच्या घरी नोटीस देण्यासाठी पोलीस गेले होते़ शेळके मात्र घरी नव्हता़ त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरावर नोटीस चिटकविली आहे़ गुन्हा दाखल झाल्यानंतर शेळके शहरातून पसार झाला असल्याची चर्चा आहे़ चौकशीसाठी तो दिलेल्या वेळेत उपस्थित राहिला नाही तर पोलिसांना त्याचा शोध घ्यावा लागणार आहे़उपनिबंधकाच्या अहवालाचा पोलीस घेणार संदर्भकर्जवाटप प्रकरणातील फिर्यादी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीवरून नगर तालुका उपनिबंधकांनी शहर सहकारी बँकेने वाटप केलेल्या कर्जासंदर्भात चौकशी करून सहकार आयुक्तांना अहवाल सादर केला आहे़ गुन्ह्याच्या तपासासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी या अहवालाचा संदर्भ घेणार आहेत़ कर्जवाटपप्रकरणी दाखल झालेल्या तीन फिर्यादी या प्रत्येकी दहा पानाच्या आहेत़ तांत्रिकदृष्ट्या हा विषय गुंतागुंतीचा आहे़ त्यामुळे पोलीस सध्या उपलब्ध कागदपत्रांच्या अधारे आणि संबंधितांच्या चौकशीतून या विषयाचा सध्या अभ्यास करत आहेत़
नगर शहर बँक कर्ज घोटाळा प्रकरण : बँकेच्या अधिका-यांची मॅरेथॉन चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 5:04 PM