अहमदनगर : स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग ही महत्त्वाची बाब आहे. नगर शहरात महापालिकेच्यावतीने प्रत्येक गुरुवारी श्रमदानातून स्वच्छतेचा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमात शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थेचे कर्मचारी तसेच महापालिकेचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. स्वच्छतेसंदर्भात आयुक्त विलास ढगे यांनी प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत अहमदनगर शहरात स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासंबंधी उपाययोजना व नियोजन, कार्यवाही महापालिकेकडून सुरू आहे. मात्र, स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. तशा सूचना नगरविकास विभागाने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला दिल्या आहेत.त्यानुसार नगर शहरात प्रत्येक गुरुवारी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. प्रभाग अधिकाऱ्यांवर ही मोहीम राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचा आढावा उपायुक्त व अतिरिक्त आयुक्त घेणार आहेत. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सावेडी प्रभाग कार्यालयांतर्गत, दुसऱ्या गुरुवारी शहर प्रभाग समिती, तिसऱ्या गुरुवारी झेंडीगेट तर चौथ्या गुरुवारी बुरूडगाव प्रभाग समिती कार्यालयांतर्गत ही मोहीम राबविली जाणार आहे. आहे. (प्रतिनिधी)
श्रमदानातून शहर स्वच्छतेचा उपक्रम
By admin | Published: February 17, 2016 10:30 PM