अहमदनगर : अवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी पकडलेल्या व दंड न भरलेल्या वाहनांचा महसूल शाखेकडून लिलाव होणार आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशाने ही कारवाई होत आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज वाहतूक सुरू असते. त्यात वाळूतस्करीचे प्रमाण जास्त आहे. गौण खनिज किंवा संबंधित तहसीलदार कारवाई करून अशी वाहने पकडतात. नंतर ही वाहने संबंधित तहसील किंवा पोलीस ठाण्यात लावली जातात. नगर तहसीलदारांनी पकडलेली अशी १९ वाहने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, तसेच काही पोलीस ठाण्यांत अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहेत. या वाहनांना सरकारी नियमाप्रमाणे केलेला पाचपट दंड व वाहन दंड संबंधित वाहनमालकाने न भरल्याने ही वाहने पडून आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या वाहनांचा मोठा अडथळा होतो. दंड भरण्याबाबत वाहनमालकांना वारंवार नोटिसा पाठवूनही प्रतिसाद न मिळाल्याने अशी वाहने लिलावातून विक्रीला काढण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांनी घेतला असून, त्याची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून केली आहे.नगर उपविभागीय कार्यालयांतर्गत अशी १९ वाहने असून त्याची लिलाव प्रक्रिया नगर उपविभागीय कार्यालयाने सुरू केली आहे. त्यानुसार सोमवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहनांची तपासणी केली. या वाहनांचे आरटीओंकडून मूल्यांकन काढून ही वाहने लिलावासाठी ठेवली जाणार आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली.