अरुण वाघमोडे । अहमदनगर : क्षेत्रफळाने राज्यात सर्वाधिक मोठा आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्याची २०११ च्या जणगणनेनुसार ४५ लाख ४३ हजार १६९ इतकी लोकसंख्या आहे. गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या पाच ते सहा लाखांनी वाढल्याचा अंदाज आहे. म्हणजेच तब्बल ५० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात सद्यस्थितीला अवघे ३ हजार २४० इतके पोलीसबळ आहे. अपुरे पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात येथील पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.पोलीस प्रशासनाच्यावतीने सध्या रेझींग डे सप्ताह (महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन) साजरा केला जात आहे. २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहस्ते महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. गेल्या साठ वर्षांच्या कार्यकाळात पोलीस दलात गरजेनुसार आवश्यक ते बदल करण्यात आले. नगर जिल्ह्यात मात्र अपवाद वगळता गरजेप्रमाणे पोलीस दल सक्षम करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. सध्याची लोकसंख्या आणि पोलिसांच्या संख्येची तुलना केली तर १५५० लोकसंख्येमागे अवघा एक पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. जागतिक स्तरावर साधारणत: २०० लोकांमागे एक पोलीस असावा असे प्रमाण आहे. महाराष्ट्रात ३०० ते ३५० लोकांमागे एक पोलीस कार्यरत असणे असे प्रमाण आहे. नगर जिल्ह्यात मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. परिक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्याच्या तुलनेत नगरमध्ये गुन्हेगारींचे प्रमाण दोन ते तीनपट अधिक आहे. या जिल्ह्यात मात्र नगरच्या तुलनेत पोलीस आणि पोलीस ठाण्यांचीही संख्या जास्त आहे. पोलीस स्टेशनचे प्रस्ताव प्रलंबित जिल्ह्यात सध्या सायबर पोलीस स्टेशन धरून ३१ पोलीस ठाणे आहेत. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व ईशू सिंधू यांनी जिल्ह्यात नव्याने बारा पोलीस ठाणे व्हावेत यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत. यावर मात्र अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. आयुक्तालयासाठी पाठपुरावा नाही जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेत नगरमध्ये पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा प्रस्ताव नऊ वर्षांपूर्वी गृहविभागाला सादर करण्यात आलेला आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या बदलीनंतर याचा सर्वांना विसर पडला. प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरूनही आयुक्तालयासाठी पाठपुरावा झालेला दिसत नाही़.गुन्ह्यांचे तपास रखडले अपुºया पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, निवडणुका, सण, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने, धार्मिक स्थळांच्या जत्रा-यात्रा हे सर्व संभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी निभावतांना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातून जिल्ह्यातील अनेक महत्त्वांच्या गुन्ह्यांचा तपास रखडल्याचे दिसत आहे.
जिल्ह्याचा विस्तार आणि लोकसंख्येच्या तुलनेत येथे मनुष्यबळाची कमतरता आहे़ जिल्ह्यात नव्याने बारा पोलीस स्टेशन व्हावेत तसेच इतर सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे़ सध्या उपलब्ध आहे ते मनुष्यबळ आणि यंत्रणेच्या माध्यमातून कामाचे नियोजन करण्यात आले आहे, असे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी सांगितले.