अहमदनगर : मैदानात सर्वत्र लावलेले सीसीटीव्ही आणि व्हिडिओ शूटिंग कॅमेºयांच्या निगराणीत सोमवारी पोलीस शिपाई भरतीला प्रारंभ झाला़ पहिल्या दिवशी बोलविण्यात आलेल्या १००० पैकी ८२१ उमेदवारांनी नोंदणी केली़ यापैकी शारीरिक चाचणीसाठी ७९५ उमेदवार पात्र तर २६ अपात्र ठरले़शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी ५ वाजता भरतीप्रक्रियेला प्रारंभ झाला़ शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रथम १६०० मीटरची धावण्याची चाचणी केडगाव येथील रिंगरोडवर घेण्यात आली़ उमेदवाराचा धावण्याचा वेळ अचूक टिपण्यासाठी प्रत्येकला अत्याधुनिक पद्धतीची चीप देण्यात आली होती़ या चाचणीनंतर पोलीस मुख्यालयातील मैदानावर लांब उडी, गोळाफेक, पुलअप व १०० मीटर धावणे या चाचण्या घेण्यात आल्या़ यावेळी प्रत्येक चाचणीचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले़शारीरिक चाचणीत पात्र ठररलेल्या उमेदवारांची १२ एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे़ भरतीसाठी मंगळवारी १५०० उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे़ शारीरिक चाचणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना एकूण किती गुण मिळाले हे तत्काळ सांगण्यात आले़ मैदानी चाचणीत अपेक्षित गुण मिळालेल्या उमेदवारांच्या चेहºयावर आनंद दिसत होता़ पोलीस शिपाई पदासाठी जिल्ह्यात १६४ जागा असून, यात महिलांसाठी ४९ जागा राखीव आहेत़ त्यासाठी एकूण ३१ हजार ७३ अर्ज आले आहेत़पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनातभरती प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, मनीश कलवानिया, उपाधीक्षक अरुण जगताप, १५ पोलीस निरीक्षक, ११ सहायक निरीक्षक, ३० उपनिरीक्षक असे अधिकारी व २७५ पोलीस कर्मचारी मैदानावर तैनात होते़प्रवेशपत्र न मिळालेल्या उमेदवारांना संधीज्या उमेदवारांनी शुल्क भरून परिपूर्ण अर्ज भरलेला आहे, मात्र त्यांना प्रवेशपत्र मिळालेले नाही, अशा उमेदवारांनाही पोलीस भरतीची संधी देण्यात येणार आहे़ प्रवेशपत्र न मिळालेल्या उमेदवारांनी ५ एप्रिल रोजी पोलीस मुख्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे़मुक्कामाची व्यवस्थाभरतीसाठी प्रक्रियेसाठी पहाटे पाच वाजता मैदानात जावे लागत असल्याने उमेदवार रात्रीच नगरला येतात़ या उमेदवारांना रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ येऊ नये यासाठी न्यू आर्ट्स महाविद्यालयात दोन रूम व पोलीस मुख्यालयातील गोडाऊनमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती़
नगरमध्ये कॅमे-यांच्या निगराणीत भावी पोलिसांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 6:43 PM