अहमदनगर : तालुक्यातील शेतक-यांनी घाम गाळून पिकवलेल्या मालाला किमान हमीभाव मिळावा या उद्देशाने नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत शनिवारी हमीभावानुसार खरेदीस सुरुवात करण्यात आली.
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभाव केंद्राचे उदघाटन युवानेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, रेवण चोभे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रोहीदास मगर, उपाध्यक्ष संभाजी पवार, जिल्हा माकेर्टींग अधिकारी परीमल साळुंखे, श्रीकांत आभाळे, बाजार समितीचे सचिव अभय भिसे उपस्थित होते. शेतक-यांनी आपली नोंदणी आॅनलाईन करावी, आपले अधारकार्ड बँक पासबुकाशी जोडलेले असावे, शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही अशी माहीती जिल्हा मार्केंटीग अधिकारी साळुंखे यांनी शेतक-यांना दिली. शेतक-यांनी मूग, उडीद व सोयाबीन स्वच्छ करून विक्रीसाठी आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये फूटतुट नसावी, काड्या, दगड असू नयेत. माल चाळणीने चाळूनच आणावा. मालाची आद्रता १२ टक्क्यांपेक्षा अधिक नसावी. कडधान्य वाळवुन आणावे. असे अवाहन या वेळी बाजार समिती व जिल्हा मार्केंटीग अधीकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे. उडीदसाठी प्रतिक्विंटल ५ हजार चारशे रुपये, मूग ५ हजार पाचशे पंच्याहत्तर प्रती क्विंटल तर सोयाबीनला ३ हजार पन्नास रुपये प्रती क्विंटल बाजारभाव मिळणार आहे.