अहमदनगर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास महापालिकेचेआयुक्त तथा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. महापालिकेच्या १७ प्रभागांतील सर्व मतदानकेंद्रे ही राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे मॉडेल मतदान केंद्रे असतील, असेही ते म्हणाले.द्विवेदी यांनी शुुक्रवारी बुथस्तरीय मतदान अधिकारी आणि त्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अरुण आनंदकर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, उपजिल्हाधिकारी संदीप आहेर, तहसीलदार तथा प्रभारी उपायुक्त एफ. आर. शेख आदींची उपस्थिती होती.१ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली असून, त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन द्विवेदी यांनी केले. प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुकाही यावेळी करण्यात आल्या.प्रभाग क्र. १, ६ आणि ७ साठी नगर उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तर प्रभाग क्र. २, ४ आणि ५ साठी विशेष भूसंपादन अधिकारी जयश्री माळी या निवडणूक निर्णय अधिकारी असून, त्यांचे कार्यालय सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलात (आकाशवाणीशेजारी)असेल. प्रभाग क्र. ३, ९ आणि १० साठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामन कदम, तर प्रभाग क्र. ८, ११ आणि १२ साठी विशेष भूसंपादन अधिकारी शाहूराज मोरे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. त्यांचे कार्यालय प्रभाग समिती क्र. २ जुना मंगळवार बाजार येथे असेल.प्रभाग क्र. १३ आणि १४ साठी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी प्रजित नायर निवडणूक निर्णय अधिकारी असून, त्यांचे कार्यालय बुरु़डगाव विभागात आहे. प्रभाग क्र. १५, १६ आणि १७ साठी उपविभागीय अधिकारी (श्रीगोंदा-पारनेर) गोविंद दाणेज निवडणूक निर्णय अधिकारी असून, त्यांचे कार्यालय केडगाव येथे असेल.आदर्श अंमलबजावणीची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी व्हावी, यासाठी आचारसंहिता कक्ष मनपाच्या मुख्य इमारतीत असून, त्याचे प्रमुख म्हणून जिल्हा पुरवठा अथिकारी संदीप निचित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक खर्च हिशोब तपासणी प्रमुख म्हणून महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात हे असतील.
नगर मनपा निवडणूक २०१८ : आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी होईल : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 5:04 PM