सुदाम देशमुख
अहमदनगर : एरव्ही हजारवेळा फोन करूनही घरासमोरचा परिसर स्वच्छ होत नव्हता की दिवाही लागत नव्हता. मात्र नगरकरांची सेवा करण्यासाठी इच्छुक आता सरसावले आहेत. स्वच्छता, दिवाबत्तीची कामे इच्छुक स्वखर्चाने करीत आहेत. ही सेवा कमी आहे की काय म्हणून दिवाळीला सुगंधी तेल, उटणे, साबण आणि सोबत मिठाईही घरपोहोच दिली जात आहे. यात कोणताही पक्ष मागे दिसत नाही. पक्षांच्या प्रमुखांचा या मतदार खरेदीवर काहीही अंकुश दिसत नाही. निवडणूक आयोगाचे याकडे दुर्लक्ष असून निकृष्ट मिठाईबाबत अन्न-औषध प्रशासनाही मौन बाळगून आहे.दिवाळी सुरू झाल्याने त्याचा फायदा घेत सर्रास मतदारांना अमिष दाखविण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. घरासमोरील कचरा दहावेळा फोन करूनही उचलला जात नव्हता. आता तो लागलीच उचलला जातो. पथदिवे बंद असले तरी त्याकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष असायचे. निवडणूक जाहीर होताच घरासमोरचा परिसर, तसेच कॉलनीमध्ये खासगी लोक येऊन साफसफाई करीत आहेत. बंद असलेले पथदिवे रात्रीतून प्रकाशमान झाले आहेत. रस्त्याची डागडुजी, चेंबर दुरुस्ती, गवत काढणे, जेसीबीने होणारी कामे आदींबाबत इच्छुक सतर्क झाले आहेत. नागरिकांनी आवाज देता क्षणी एक नव्हे तर चार-चार जण सेवेला हजर आहेत.दिवाळी आल्यामुळे इच्छुकांची मिठाई घरोघरी गेली आहे. चार जणांच्या नावांच्या मिठाईचे बॉक्सच घरात पोहोचले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ््या प्रकारची मिठाई आहे. कमी खर्चात बॉक्सभरून मिठाई दिल्यामुळे खावी की नको? अशी मतदारांत भिती आहे. काही प्रभागात मिठाईने अनेकांचे घसे बसले आहेत. भितीपोटी मतदार तक्रार करत नाहीत. प्रशासनही दुर्लक्ष करते. अनेक उमेदवारांनी शुभेच्छा पत्रे, मेहेंदीही पोहोचवली आहे. त्यामुळे आता आकाशकंदील, फटाके मिळणार का? अशीच प्रभागात चर्चा सुरू आहे. एका प्रभागात तर एका इच्छुकाने लोकांच्या दारावर त्यांच्या नावाच्या पाट्या (नेमप्लेट) तयार करून दिल्या आहेत. ठेकदार, हॉटेलचालक, गुंठामंत्री, रिएल इस्टेट एजंट अशांचाच इच्छुकांमध्ये मोठा भरणा आहे.