-----------------
श्री मार्कंडेय मंदिरात महाआरती
अहमदनगर : येथील गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिरात मार्कंडेय जयंती उत्सव भाविकांच्या उपस्थितीत व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पद्मशाली युवा शक्ती (ट्रस्ट) अंतर्गत पद्मशाली महिला शक्तीच्या वतीने समाजातील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. हळदी-कुंकू समारंभाची सुरुवात महिलांच्या हस्ते भगवान श्री मार्कंडेय यांची महाआरती करून झाली. कार्यक्रम आयोजनात सुरेखा विद्ये, नीता बल्लाळ, सारिका सिद्दम, लक्ष्मी म्याना, कविता भारताल, वैशाली बोडखे, जयश्री म्याना, उमा कुरापाटी यांचे विशेष सहकार्य लाभले.
--------------------
विखे पाटील अभियांत्रिकीत विद्यार्थ्यांचे स्वागत
अहमदनगर : विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयातील प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. उदय नाईक, उपसंचालक (टेक्निकल) प्रा. सुनील कल्हापुरे, डॉ. एस. एम. मगर, डॉ. दीपक विधाते, डॉ. यु. ए. कवडे, डॉ. ए. के. पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. नाईक पुढे म्हणाले, २०२० वर्ष हे सर्वांना खूपच त्रासदायक गेले. १० महिने शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. कोरोना महामारीनंतर आता विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रवेशानंतर देखील मास्क लावणे, सॅनिटायझर करुन सुरक्षित अंतर ठेवून कोरोनाशी लढा देत शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करावी.
---------------
धरतीचौक भागात पाण्याची टंचाई
अहमदनगर : शहरातील काळू बागवान गल्ली, ख्रिस्तगल्ली परिसरात तीन वर्षांपासून १० ते १२ घरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. याबाबत अनेकवेळा अधिकारी, पदाधिकारी यांना निवेदने दिली. परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही झालेले नाही. येथील रहिवाशांना लांबून पाणी आणावे लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागात अधिकाऱ्यांनी समक्ष येऊन पाहणी करावी व पाण्याची समस्या दूर करावी, अशा मागणीचे निवेदन मानव संरक्षण समितीचे शहराध्यक्ष इम्रान बागवान यांनी मनपा आयुक्तांना दिले. यावेळी योग्य ती कार्यवाही करण्याचे उपायुक्तांनी आश्वासन दिले.
--------------
फलक लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी
अहमदनगर : शहरात गत आठवड्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षाचा फलक लावण्यात आला होता. कार्यक्रम सरकारी असूनही तसेच सरकारी कार्यालयाच्या इमारतीवर राजकीय फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, भैरवनाथ खंडागळे, अनिल शेकटकर, बाबासाहेब करपे, शंभू नवसुपे, बाबासाहेब जाधव, जनार्दन कुलट, निलेश जायभाय आदी उपस्थित होते.