अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत एक वर्षापूर्वी राबविलेला भाजप-राष्ट्रवादी आघाडीचा सत्तेचा पॅटर्न आज राज्यातही प्रत्यक्ष अवतरला. शिवसेनेला बाजूला ठेवत भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन नगर महापालिकेत भाजपचा महापौर झाला. तोच पॅटर्न आता भाजपने राज्यात आणला आहे.अहमदनगर महापालिकेसाठी डिसेंबर २०१८ मध्ये निवडणूक झाली. यामध्ये ६८ पैकी शिवसेनेला सर्वाधिक २४ जागा मिळाल्या होत्या. त्याखालोखाल राष्ट्रवादीला १८, भाजपला १४, काँग्रेसला ५, बसपाला ४, अपक्ष २ आणि समाजवादी पक्षाला १ जागा मिळाली होती. सर्वाधिक २४ जागा मिळवूनही भाजपने शिवसेनेला सोबत न घेता राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापौरपद पटकावले. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या १८ सदस्यांनी उघडपणे भाजपला पाठिंबा दिला. यावेळी काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी अनुपस्थित राहून भाजपला अप्रत्यक्ष साथ दिली होती. त्यामुळे नगर महापालिकेत भाजपचा महापौर झाला.महापालिकेत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय अजित पवार यांनीच दिल्याची त्यावेळी चर्चा होती, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या कारणावरून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तसेच शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनाही पदावरून हटवले होते. लोकसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी त्या सर्व नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. सत्तेचा हा पॅटर्न नगर महापालिकेत मात्र टिकून आहे. एक वर्षानंतर नगर महापालिकेतील सत्तेचा हा पॅटर्न आज राज्यातही अवतरला आहे. त्यामुळे नगर येथील भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सत्तेचा ‘नगरी पॅटर्न’ आता राज्यातही; महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:49 PM