सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीतील अहमदनगरची जागा काँग्रेसला, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दुपारी येथे प्रसारमाध्यमांसमोर केल्यानंतर सायंकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे टिष्ट्वट केले.
नगरची जागा काँग्रेसला सोडणार का?, असे पवार यांना विचारले असता त्यांनी मान हलवत ‘होय.. काँग्रेसला’, असे उद्गार काढले. पवार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सायंकाळी जयंत पाटील यांनी टिष्ट्वट करत काही प्रसारमाध्यमांनी अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षासाठी सोडली असल्याची चर्चा सुरू केली आहे. असा निर्णय झालेला नसून, बातम्या तथ्यहीन आहेत, असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने नगरची जागा प्रतिष्ठेची केली होती. ही जागा काँग्रेसला सोडावी म्हणून मोठ्या प्रमाणावर दबाव आणला जात होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ही जागा सोडणार नसल्याचे म्हटले होते.
रविवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, सुजय हा शरद पवारांसाठी नातवासारखा आहे. त्यामुळे त्यांनी नातवाला आशीर्वाद द्यावेत, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या होत्या.
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या आश्वासनाचे पालन साडेचार वर्षांत सरकारला करता आले नाही. मत द्या भाजपाला अन् आरक्षण मागता आम्हाला हे वागणं बरं नव्हं असे मिश्किलपणे पवार म्हणाले. विजयसिंह मोहिते-पाटील अथवा रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यापैकी एक मोहिते-पाटील आपल्यासोबत संसदेत असेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे?करमाळा येथे झालेल्या मेळाव्यात पवार म्हणाले, मुख्यमंत्री होण्याअगोदर देवेंद्र फडणवीसांना कोणी ओळखत होते का? भुईमुग नक्की कुठे उगवतो हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का?