अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी मागील साडेचार महिन्यांत पोलिसांनी ७४ हजार ५२७ कारवाया करीत तब्बल ९४ लाख २५ हजार ६७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षभरात २६ हजार ८५६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
कोरोना प्रतिबंधासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. नियमांच्या अंमलबजावणीची सर्वाधिक मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. गेल्या वर्षात पोलिसांनी चोवीस तास रस्त्यावर खडा पहारा देत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मागील वर्षी नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यावर्षी मात्र दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून नियम पाळण्याबाबत नागरिकांना समज दिली आहे.
गेल्या काही दिवसांत नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा नव्याने उद्रेक वाढल्याने पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, गर्दी करणे आदी नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या कडक अंमलबजावणीमुळे नियम तोडणाऱ्यांना चांगलाच वचक बसला आहे.
..........
मास्क न वापरणाऱ्या ६९ हजार ९७२ जणांवर कारवाई
घराबाहेर पडल्यानंतर मास्क न वापरणाऱ्या ६९ हजार ९७२ जणांवर पोलिसांनी कारवाई करीत एकूण ८६ लाख ३३ हजार ७०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
...........
पिचकारी बहाद्दरांनाही दणका
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १ हजार ६३१ जणांकडून २ लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
.............
सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणाऱ्या १ हजार ९०६ जणांवर पोलिसांनी कारवाई करीत २ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे
..............
२० मंगल कार्यालय चालकांवर कारवाई
जिल्ह्यात १९ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान कोरोनासंदर्भात लागू करण्यात आलेले नियम न पाळणाऱ्या ३० मंगल कार्यालय चालकांवर पोलिसांनी कारवाई करीत १ लाख ८५ हजार रुपयांचा दंड केला आहे.
......................
पोलिसांकडून नियमांची कडक अंमलबजावणी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांची जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात
पोलिसांकडून कडक अंमलबजावणी होत आहे. शास्त्रशुद्ध नियोजन व कारवाईतील सातत्यामुळे आधीच्या तुलनेत लोक आता गांभीर्याने नियम पाळताना दिसत आहेत. मात्र, जेथे उल्लंघन होत आहे तेथे तात्काळ कारवाई होत असल्याचे जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.