अहमदनगर : कडाक्याचे ऊन, पावसाची रिमझिम आणि ढगाळ वातावरण अशा बदलत्या वातावरणामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे़ व्हायरल इन्फेक्शनमुळे डोकेदुखी, अंगदुखी, ताप आणि सर्दी- खोकल्याच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ सरकारी रुग्णालयांत ही संख्या कमी दिसत असली तरी शहरासह ग्रामीण भागातील खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत़ त्यामुळे खासगी रुग्णालयांतील रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे़शहरासह जिल्ह्यात काही दिवस कडक ऊन, काही दिवस ढगाळ वातावरण, असा खेळ सुरू आहे़ त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता वाढली आहे़ डासांचे प्रमाणही वाढले आहे़ सध्या वातावरणामुळे संसर्गजन्य रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे़ त्याचा परिणाम सध्या घरोघरी दिसून येत आहे़ व्हायरल इन्फेक्शनमुळे नगर शहर व ग्रामीण भागातील अनेक नागरिक आजारी पडले आहेत़ खासगी रुग्णालयांत रुग्णांची नेहमीपेक्षा तिपटीने वाढ झाली आहे़ रुग्णालयांत रक्त, लघवी यांसारख्या तपासण्यांसाठी लांबच लांब रांगा पहायला मिळतात़ त्यात डेंग्यूने डोके वर काढले आहे़ त्यामुळे विविध तपासण्या करून घेण्याकडे नागरिकांचा कल आहे़व्हायरल ताप आल्यानंतर तो आठवडाभर राहत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे़ थोडी शंका आली तरी, प्रत्येकजण फॅमिली डॉक्टरांचा सल्ला तर घेतातच़ तसेच पाणी उकळून गाळून पिणे, यांसारखे घरगुती उपाय अनेकजण करू लागले आहेत़ शासकीय रुग्णालयांत रुग्णांची संख्या कमी आहे़ तुलनेत खासगी रुग्णालयांतील गर्दी कमालीची वाढली असून, तपासणीसाठी तासन्तास बसावे लागते़ काहीजण औषधालयातून गोळ्या घेऊन आराम करणे पसंत करतात़ परिणामी शहर व ग्रामीण भागातील मेडिकल सध्या हाऊसफुल्ल असून, ग्रामीण भागात तर सर्दी व खोकल्याच्या गोळ्या किराणा दुकानातही उपलब्ध होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे़ डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्या घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांचे मत आहे़ (प्रतिनिधी)महापालिकेच्या वतीने पाण्याच्या टाक्यांचे सर्वेक्षण करणे, फवारणी, फिरता दवाखाना यांसारख्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत़ नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा़ घराच्या परिसरात टायर व भंगार साहित्यांमध्ये पाणी साचणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी़-डॉ़ अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी, महापालिका.
शहर व्हायरलने बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2016 11:57 PM