नगर-पुणे महामार्गावर स्टेट बँक चौक ते चांदणी चौक यादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. मात्र, या मार्गावरून जाणारी सर्व जड वाहने, हलकी वाहने दिल्ली गेटमार्गे शहराच्या बाहेर पडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची गर्दी होत आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच महापालिकेने नीलक्रांती चौक ते बागरोजा हडको या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सावेडी, डीएसपी चौक, पत्रकार चौक, अप्पू हत्ती चौकाकडून येणारी सर्व वाहने दिल्ली गेटसमोरून जात आहेत. त्यात बालिकाश्रम रोडकडून येणारी वाहने दिल्ली गेटसमोरूनच बाहेर पडत आहेत. या वाहनांच्या कोंडीत जड वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे अप्पू हत्ती चौक ते नेप्ती चौक हा मार्ग सोमवारी ठप्प झाला होता. या रस्त्यावरून वाहन नेणे कठीण झाले होते. पुढे नगर-पुणे रोडवरही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. चांदणी चौकातील कोंडीमुळे नगर-पुणे रोडवर चांदणी चौक ते माळीवाडा बसस्थानकापर्यंत रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कोठला भागातून, तसेच औरंगाबाद रोडवरून येणारी वाहने हॉटेल अशोकामार्गे बीएसएनल कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने कोठीकडे जात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही मोठी कोंडी झाली होती. या कोंडीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, वरिष्ठ महसूल अधिकारीही अडकले होते. अखेर वाहनांमधून उतरून त्यांना बैठकांमध्ये सहभागी होण्याची वेळ ओढावली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शहरातील सर्वच रस्त्यांवर कोंडी असल्याने अनेक वाहनधारक कापड बाजार, तेलीखुंट, सर्जेपुरा, चितळे रोड, डाळ मंडई या मार्गाने वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे नगर शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.
---------------
पोलीस, महापालिका-सार्वजनिक बांधकाम खात्यात समन्वयाचा अभाव
सार्वजनिक बांधकाम खाते, महापालिकाच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने एकाचवेळी अनेक रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने शहरातील इतर रस्ते बंद नसावेत, याबाबत यंत्रणांमध्ये ताळमेळ नाही. सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिकेने वाहतूक शाखेशी संपर्क करून वाहतूक नियंत्रणाबाबत नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडली आहे.
--------------