अहमदनगर : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील नगर अर्बन को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ४० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या पत्राबाबत विधी सल्लागाराचे मत घेऊन संचालक मंडळ किंवा अधिकारी यांना नोटिसा दिल्या जातील. यामध्ये जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे नगर अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आरबीआयचे संबंधित पत्र विधी सल्लागारांना देण्यात आले आहे. त्यांचा सल्ला काय येतो, ते पाहणे महत्त्वाचे असेल. संचालक मंडळ किंवा अधिकारी यांना नोटिसा पाठविण्याबाबत सल्ला मिळाला तर त्यापद्धतीने कार्यवाही केली जाईल. नोटिसानंतर त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. त्यानंतर जबाबदारी निश्चित होईल आणि संबंधितांकडून दंड वसूल केला जाईल. दंड करण्यापूर्वी आरबीआयच्या अधिकाºयांकडे शिष्टाई केली. प्रशासक नियुक्ती, बँकेची स्थिती आणि कोरोना लॉकडाऊनमुळे बँकेचे काही प्रमाणात होत असलेले नुकसान याबाबत आरबीआयला माहिती दिली. मात्र काही ना काही दंड करणे क्रमप्राप्त असल्याने दंडमाफी होणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले.
दंड भरण्यासाठी १४ दिवसांची मुदतआरबीआयने ४० लाख रुपयांचा दंड भरण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिलेली आहे. १४ दिवसांमध्ये ही रक्कम भरावीच लागणार आहे. ती रक्कम नंतर कोणाकडून वसूल करायची ते जबाबदारी निश्चितीनंतर ठरेल. मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा शिष्टाई करून दंडमाफीबाबत प्रयत्न केले जातील. बँकेची वस्तुस्थिती आरबीआयसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल,असे मिश्रा म्हणाले.