अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे उपद्रवींचे चांगलेच धाबे दणाणले आहेत़ शहरातील रस्त्यांवरून रात्रीअपरात्री बाईक फॅशन करत टुकारगिरी करणारे टोळके पोलिसगिरीमुळे गायब झाले आहेत.महापालिका निवडणूक शांतेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी शहरातील ६६४ उपद्रवींचे तडीपारीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केले़ यातील ४१६ जणांना शहरातून तडीपार करण्यात आले़ तर उर्वरितांना अटी व शर्तीवर शहरात राहण्याची परवानगी दिली आहे़ पोलिसांनी चालविलेल्या या ‘तडीपारी’ शस्त्रामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उपद्रवी नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आधीच घायाळ झाले़ त्यातच गेल्या पाच ते सहा दिवसांत पोलिसांनी धडक मोहीम राबवून जूगार, दारू, कत्तलखाने यावर छापासत्र सुरू केल्याने अवैध व्यवसायिकांचेही धाबे दणाणले आहेत. शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे़ यामध्ये रात्रीअपरात्री विनाकारण फिरणाºया टोळक्यांना पोलिसांकडून जाब विचारला जात आहे़तसेच वाहनांचीही तपासणी केली जात आहे़ त्यामुळे रात्री रस्त्यावर एकत्र उभा राहून आरडाओरडा करणारे, महिलांची छेड काढणारे रोडमिओ सध्या गायब झालेले दिसत आहेत़ नगर शहरात पोलिसगिरी अशीच कायम रहावी, अशीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षाआहे़दादागिरी, भाईगिरीचा आवाज क्षीणपोलिसांनी ‘खाकी’चा दम दाखविण्यास सुरूवात केल्याने चौकाचौकात दादागिरी करणाºया गल्लीतील दादा आणि भार्इंचाही आवाज सध्या क्षीण झाला आहे़ निवडणुकीच्या काळात गल्लीबोळातील दादांना सुगीचे दिवस येत होते़ या निवडणुकीत मात्र राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवारांनी अशा दादा, भार्इंपासून चार हात दूर राहनेच पसंत केले आहे़तडीपारांवर वॉचपोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तांवापैकी ४१६ जणांना शहरातून ११ डिसेंबरपर्यंत तडीपार करण्यात आले आहे़ हे तडीपार गुंड शहरात फिरताना आढळून आले तर त्यांना तत्काळ अटक करण्यात येणार आहे़ यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पाच विशेष पथकांची स्थापना केली आहे़रात्रीच्या बर्थ डे सेलिब्रेशनला ब्रेकगेल्या काही दिवसांपासून नगर शहरात रात्री बारा वाजता रस्त्यावरील चौकात बर्थ डे सेलिब्रेशन करण्याची फॅशन रूढ झाली आहे़ मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दहा-वीस तरूण रात्री चौकात केक कापून म्युझिक लावून झिंगाट होतात़ यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता़ रस्त्यावर अशा पद्धतीने गोंगाट करणाºयांवर पोलिसांनी सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई सुरू केल्याने असे बर्थ डे बॉय सध्या गायब झाले आहेत़
पोलिसगिरीमुळे नगर शहरातील भाईगिरी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:41 PM