लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : श्रीरामपूर बाजार समिती ही चिकूच्या खरेदी विक्रीसाठी संपूर्ण जिल्ह्यात नावारुपाला आली आहे. येथे दररोज २५ ते ३० टन चिकूची सध्या आवक सुरू असून हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेशातील ग्राहकांना त्याची भुरळ पडली आहे. त्यामुळे दररोज सुमारे ३० लाख रुपयांची उलाढाल होत आहे. बाजार समितीत तयार झालेल्या या विक्री व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
जानेवारी ते मार्च महिना हा चिकूचा हंगाम मानला जातो. उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासे व स्थानिक चिकूच्या विक्रीकरिता येथील बाजार समितीत गेल्या दोन वर्षांपासून मोठा बाजार उपलब्ध झाला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या देशभरातील व्यापाऱ्यांशी असलेल्या संबंधातून मोठी विक्री व्यवस्था उभी राहिली आहे, अशी माहिती सचिव किशोर काळे यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील चिकू हा त्याच्या गुणवत्तेकरिता देशभर ओळखला जातो. टिकाऊपणा हे त्याचे खास वैशिष्ट्य ठरले आहे. त्याचबरोबर आतून रंगाने लालसर असल्याने ग्राहकांच्या नजरेला तो पसंत पडतो. खाण्यासही हा चिकू गोड व मुलायम आहे. त्यामुळे देशभरातील ग्राहकांमधून त्याला मागणी आहे.
सध्या किलोमागे १५ ते २२ रुपयापर्यंत दर असल्याचे व्यापारी याकूबभाई बागवान, जमीर बागवान यांनी सांगितले. चांगली मागणी असल्याने तेजीतही दर टिकून आहेत.
---------
रोखीने व्यवहार
नगर जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत येथे व्यापारी चिकू खरेदी केल्यानंतर रोखीने पैसे अदा करतात. त्यामुळे साहजिकच येथे चिकूचा बाजार विकसित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातून आवक वाढली आहे.
----------
गुजरातपेक्षा सरस माल
नगर जिल्ह्यातील चिकूचा हंगाम हा जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सुरू होतो. गुजरातचा माल मात्र उशिरा सुरू होता. जिल्ह्यातील चिकू हा अधिक टिकाऊ आहे. ग्राहकांनी खरेदी केल्यानंतर तो दोन ते तीन दिवस खाण्यालायक राहतो. गुजरातचा चिकू मात्र एकच दिवस टिकतो. नगरी चिकू हा आतून लाल रंगाचा, तर गुजरातचा माल हा पांढरा असतो. त्यामुळे तेथील मालास पुरेशी मागणी नाही.
---------
कालीपत्ती चिकू
नगर जिल्ह्यात चिकूच्या कालीपत्ती या व्हरायटीचे उत्पादन घेतले जाते. ही व्हरायटी सालीसह खाता येते किंबहुना तशी खाल्ल्याने अधिक प्रथिने मिळतात.
----------