अहमदनगर: धनशक्ती विरोधात सेनेने मतदारांमध्ये वैचारिक पेरणी केली आहे़ मतदार अशा अपप्रवृतींना कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही़ यंदाची विधान परिषद निवडणूक नगरच्या राजकारणाला एक वेगळी कलटणी देणारी आहे. पुढील राजकारणाची ही एक नांदी असणार आहे, असा आशावाद जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला़ शिवतारे म्हणाले, राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदारांचे विधान परिषदेतील काम शून्य आहे़ सहा वर्षांत जिल्ह्याच्या समस्या सभागृहात मांडल्या नाहीत. सहा वर्षांतून ते एकदाही मतदारसंघात फिरकले नाहीत़ यावरून त्यांची कार्यपध्दती लक्षात येते़ पैसा आणि ताकदीच्या जिवावर निवडणुका लढविल्या जात आहेत़ ही प्रवृत्ती समाजविघातक आहे़ त्यामुळे अशा अपप्रवृत्तींना जिल्ह्याच्या राजकारणापासून बाजूला ठेवणे, ही सर्वांचीच जबाबदारी आहे़ सकारात्मक राजकारणाची नगर जिल्ह्याला मोठी परंपरा आहे़ हाच मुद्दा घेऊन सेना निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे़ ही बाब मतदारांच्या निदर्शनास आणून देण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे़ त्यासाठी गेले पाच ते सहा दिवस नगर जिल्ह्याचा दौरा केला़ तो यशस्वी झाला़ या दौऱ्यात आमदार विजय औटी यांची भूमिका महत्वाची होती़ यानंतर आ़ औटी व माजी आमदार अनिल राठोड जिल्ह्यातील सर्वच मतदारांच्या गाठी-भेटी घेतील. विघातक प्रवृतींचा बिमोड क रण्यास मतदारांची मोट बांधण्याचे काम सेना व भाजपाकडून सुरू आहे़ सेना व भाजपाचे एकही मत फुटणार नाही, यात शंका नाही़ दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याकडे मदत मागितली का, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता निवडणूक असल्याने विरोधकांना मते मागावी लागतात, असे सांगून शिवतारे यांनी अधिक बोलणे टाळले़ राज्यातही दोन्ही पक्षांत काही मुद्यांवरून मतभेद आहेत, याचा अर्थ दोन्ही पक्षात एकी नाही, असा होत नाही़ दोन्ही पक्ष ताकदीनिशी निवडणूक लढविणार आहेत. यावेळी माजी आमदार अनिल राठोड, नगरसेवक अनिल शिंदे, अनिल लोखंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नगरच्या राजकारणाला कलाटणी देणार
By admin | Published: December 20, 2015 11:16 PM