महानगरपालिकेच्या अमृत जलवाहिनीचे काम सध्या चालू आहे. काम चालू असताना जुन्या जलवाहिनीला जेसीबीला जोराचा धक्का बसल्यामुळे ही जलवाहिनी फुटली. पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे हे पाणी गावातील मातंग गल्लीमध्ये शिरले. अचानक घरात पाणी घुसल्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच सरपंच सुनीता सरक, सखाराम सरक घटनास्थळी दाखल झाले. या पाण्याच्या प्रवाहात तिघी मायलेकी बुडाल्या होत्या. स्थानिक तरूण शुभम उमाप व बाबूराव वाघमारे यांच्या मदतीने तिघी मायलेकींना वाचविण्यात यश आले. पाण्याच्या प्रवाहात संसारोपयोगी साहित्य वाहून गेलेल्या चार कुटुंबांचे जि. प. शाळेत तात्पुरते स्थलांतर करून त्यांच्या जेवणाची व झोपण्याची व्यवस्था केली. यासंदर्भात सरपंच सरक यांनी खासदार सुजय विखे, तहसीलदार उमेश पाटील, भाऊसाहेब बेल्हेकर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून घडलेल्या घटनेची तत्काळ माहिती दिली.
गणपत वाघमारे, संजय वाघमारे, हिरामण वाघमारे, राहुल उमाप, रोहिदास उमाप, रामू उमाप यांच्या घरात पाणी घुसले. यामुळे घरांची पडझड झाली. संसारोपयोगी साहित्यासह कपडे, धान्य, किराणा, भाजीपाल्याचे नुकसान झाले.
---
०९ नांदगाव
नांदगाव येथे जलवाहिनी फुटल्यानंतर आलेल्या पाण्यात वाहून जाणाऱ्या मायलेकींना वाचविताना युवक.