अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता ॲानलाईन जाहीर करण्यात आला. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९४.४८ टक्के लागला. गतवर्षीपेक्षा हा निकाल दोन टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे.
मागील वर्षी आपापल्या शाळेतच परीक्षेचे केंद्र होते. यावर्षी मात्र नेहमीप्रमाणे इतर केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करून काॅपीमुक्त अभियान शिक्षण विभागाने राबवले. काटेकोर नियोजन केल्याने गैरप्रकार टळले. नगर जिल्ह्यातून मार्च २०२३च्या परीक्षेसाठी ३७ हजार ८९५ मुली, तर २९ हजार ९७९ मुले असे एकूण ६७ हजार ८७४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३५ हजार १६४ विद्यार्थी व २८ हजार ९६८ विद्यार्थिनी असे एकूण ६४ हजार १३२ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. यात मुलांचा निकाल ९२.७९, तर मुलींचा निकाल ९६.६२ टक्के आहे. जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६.७२ आहे. तर सर्वात कमी ९१.७१ टक्के निकाल पाथर्डी तालुक्याचा आहे.