देवळाली प्रवरा : देशपातळीवरील स्वच्छता सर्वेक्षणात राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरास स्वच्छ सर्वेक्षणाचा ‘नावीन्यपूर्ण उत्कृष्ट शहर, उत्कृष्ट प्रकल्प’ पुरस्कार तर येथील कॅन्टोन्मेंट बोर्डला देशपातळीवरील सहावा पुरस्कार प्रदान करण्यात आला़ बुधवारी (दि़६) नवी दिल्लीतील विज्ञानभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले़देशभरात स्वच्छ सर्व्हेक्षण घेण्यात आले. त्यामध्ये देवळाली प्रवरा नगरपालिकेने सहभाग नोंदवला होता. नगरपालिकेने स्वच्छ भारत सर्व्हेक्षणामध्ये नगरपालिका कामगारांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला. येथे स्वच्छतेबाबत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आले आहेत. त्यात नागरिकांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे स्वच्छ सर्व्हेक्षणातील ‘क’ वर्ग नगरपालिकांमधील ‘नावीन्यपूर्ण उत्कृष्ट शहर, उत्कृष्ट प्रकल्प’ पुरस्कारासाठी निवड झाली. बुधवारी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात सकाळी ११.३० वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात १० महापालिका व नगरपालिकांना स्वच्छ शहर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी स्वच्छ भारत मिशनचे सहसचिव विनोद कुमार जिंदाल, गृहनिर्माण शहर विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा आदींच्या हस्ते देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, गटनेते सचिन ढूस, बांधकाम अभियंता सुरेश मोटे यांनी ‘नावीन्यपूर्ण उत्कृष्ट शहर, उत्कृष्ट प्रकल्प’ पुरस्कार स्वीकारला.देवळाली प्रवराची स्वच्छ शहर म्हणून निवड झाली आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र दिल्ली येथे स्वीकारले आहे. या पुरस्कारासाठी नागरिक, अधिकारी, कामगार यांचा वाटा मोठा आहे. कोणतेही काम करताना सर्वांना बरोबर घेऊन केले. तर त्याचे फळ निश्चितच मिळते. -सत्यजित कदम, नगराध्यक्ष, देवळाली प्रवराकोणत्याही शहराची ओळख त्या शहराच्या स्वच्छतेवर असते. या अभियानात कँन्टोन्मेंटच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, तसेच नागरिकांचे सहकार्य मिळाले. त्यामुळे हा पुरस्कार त्यांचाच आहे. - बी. एस. श्रीवास्तव, मुख्य कार्यकारी अधिकारी, कँन्टोन्मेंट अहमदनगर
स्वच्छ भारत सर्वेक्षण : स्वच्छतेत‘देवळाली प्रवरा’उत्कृष्ट : छावणी बोर्ड देशात सहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 12:52 PM