जामखेड : आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे खरे राणादा आहेत. त्यांनी कर्जत-जामखेड बरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही स्वच्छतेचे काम करावे. त्यांच्यात ती धमक आहे. ते स्वच्छ महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र करू शकतात, असे अभिनेत्री अक्षया देवधर यांनी सांगितले.
स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड या कार्यक्रमानिमित्ताने त्या येथील ल. ना. होशिंग विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, केंद्र शासनाचे स्वच्छता दूत गणेश शिंदे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, कर्जत-जामखेडचे विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, राजेंद्र पाटील, पवनराजे राळेभात, युवा नेते महेश राळेभात, महेंद्र राळेभात, राजेश मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, नगरसेवक विद्या वाव्हळ, दिंगाबर चव्हाण, अमित जाधव, मोहन पवार, अमोल गिरमे, लक्ष्मण ढेपे, मनोज भोरे, माजी सभापती सुभाष आव्हाड, देवदैठणचे सरपंच अनिल भोरे, ईस्माईल सय्यद, राजू गोरे आदी उपस्थित होते.
देवधर म्हणाल्या, प्रत्येकाने घरापासून स्वच्छतेला सुरूवात करा. लहान मुलांना स्वच्छतेची सवय लावा. मी परत जामखेड शहर पाहण्यासाठी येणार आहे.
आमदार पवार म्हणाले, जामखेड शहराच्या सुशोभीकरणाबरोबरच चांगले रस्ते, बागा, क्रिंडागणे व अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षांत जामखेडचा चेहरा-मोहरा बदलून स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड होणार आहे, असे सांगितले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी प्रास्ताविक केले.